वृत्तसंस्था/ कतार
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील लीगमध्ये झुंजार खेळ केलेल्या लढवय्या ऑस्टेलियाचे आव्हान अर्जेन्टिनाने उप-उपान्त्यपूर्व फेरीत संपुष्टात आणताना त्यांचा 2-1 असा पराभव केला. अहमद बिन अली स्टेडियमवर आपल्या फुटबॉल कारकिर्दीतील 1000 सामना खेळणाऱया लायोनेल मेस्सीने पहिला गोल करून अर्जेन्टिनाचे गोलांचे खाते उघडले.
त्यानंतर दुसऱया सत्रात ज्युलियन अल्वारेझने अर्जेन्टिनाचा दुसरा गोल केला. ऑस्ट्रेलियाच्या एकमेव गोलची नोंद ‘सेल्फ’ गोलवर झाली. आता उपान्त्यपूर्व फेरीत अर्जेन्टिनाचा सामना अमेरिकेला 3-1 असे पराभूत करणाऱया नेदरलँड्सशी होईल. सामन्याच्या 35 व्या मिनिटाला मेस्सीने गोल करून संघाला आघाडीवर नेले. त्याचा हा 94 वा आंतरराष्ट्रीय गोलही ठरला तसेच त्याने दिएगो माराडोनाचा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत केलेल्या 8 गोलांचा विक्रमही मागे सारला. मेस्सीचे आता कारकिर्दीत 789 गोल झाले आहेत.
प्रारंभी या लढतीवर अर्जेंटिनाने वर्चस्व ठेवले. त्यांच्या आलेझांद्रो गोमेझ, इंझो फर्नांडिस व अल्वारेझने सुरेख खेळ केला. मात्र या त्रिकुटाला ऑस्टेलियाची अभेद्य बचावफळी भेदता आली नाही. गोमेझला गोल नोंदविण्याची संधीही मिळाली होती. यावेळी त्याने डाव्या बगलेतून हाणलेला फटका दिशाहीन ठरला.
ऑस्टेलियाने सामन्यातील आपली धोकादायक चाल 30 व्या मिनिटाला केली. यावेळी हॅरी सावटरने मारलेला हेडर कमजोर होता. सामन्यासाठी आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी जमलेल्या अर्जेन्टिनाच्या पाठिराख्यांना निराश केले नाही. मेस्सीने 35 व्या मिनिटाला फ्री किकवर फटका मारला. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने तो परतविल्यानंतर चेंडू आलेक्सिस मॅक ऍलिस्टरला मिळाला. त्याने तो निकोलस ओटामेंडीकडे दिल्यानंतर त्याने तो मेस्सीकडे दिला. यावेळी मेस्सीने मारलेला जमिनीलगतचा फटका गोलरक्षक रायनला भेदून जाळीत गेला.
दुसऱया सत्रात ऑस्टेलियाचा गोरलक्षक रायनच्या चुकीमुळे अर्जेन्टिनाने दुसरा गोल केला. यावेळी अल्वारेझने त्याच्या चुकीचा फायदा घेत चेंडूला गोलमध्ये टाकले आणि दुसऱया गोलाची नोंद केली. दोन गोलांच्या पिछाडीनंतरही ऑस्ट्रेलियाने जिगरबाज खेळ केला व 77 व्या मिनिटाला एका सेल्फ गोलने त्यांची पिछाडीही एका गोलने कमी झाली. यावेळी क्रेग गुडविनने हाणलेला शक्तिशाली फटका अर्जेन्टिनाच्या इंझो फर्नांडिसला स्पर्श करून जाळीत गेला.
गोल बाद करून सामना जादा वेळेत नेण्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपली आक्रमणे अधिक तेज केली. अशाच एका प्रयत्नात त्यांच्या अझीज बेहिच याने अर्जेन्टिनाच्या ’डी’ कक्षेत प्रवेश केला आणि फटका हाणण्याच्या प्रयत्नात असतानाच लिझेंद्रो मार्टिनेजने त्याचा हा यत्न हाणून पाडला. शेवटच्या क्षणी मेस्सीलाही गोल करण्याच्या दोन सुवर्णसंधी मिळाल्या होत्या, मात्र यात दोन्ही वेळी तो अपयशी ठरला. सामना संपण्यास काही सेकंद बाकी असताना ऑस्ट्रेलियाच्या गारांग कुवोलचीही गोल करण्याच संधी वाया गेली.