निपाणी : विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगाने लागलीच जि. पं. व ता. पं. निवडणुका घेण्याची तयारी चालवली आहे. या निवडणुकीसाठी मतदारयादी बनविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 29 मे ते 27 जूनपर्यंत मतदार यादी बनविण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यानंतर जुलै अथवा ऑगस्टमध्ये या निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. फेब्रुवारी 2016 मध्ये जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुका झाल्या होत्या. एप्रिल 2021 मध्ये या सभागृहांची मुदत संपली. तेव्हापासून गेली दोन वर्षे राज्यातील 31 जिल्हा पंचायती व 239 तालुका पंचायतींमध्ये प्रशासकराज आहे. कोरोनामुळे निवडणूक प्रक्रिया लांबली. यानंतर निवडणूक आयोगाने गेल्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणुका घेण्याची तयारी केली होती. त्यानुसार मतदारसंघ पुनर्रचना व आरक्षणाची प्रक्रियाही पूर्ण झाली होती. मात्र यानंतर या प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देण्यात आले.
अशातच सरकारने मतदारसंघ पुनर्रचना व आरक्षणाचे अधिकार निवडणूक आयोगाकडून काढून घेत पंचायतराज खात्याच्या अखत्यारीत स्वतंत्र सीमा निर्णय आयोग स्थापन केला होता. यानंतरही सदर कामास दिरंगाई झाल्याने उच्च न्यायालयाने याची गांभीर्याने दखल घेत जिल्हा पंचायत व तालुका पंचायतीच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याच्या सूचना दिल्या. याचदरम्यान विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे जिल्हा व तालुका निवडणुका काहीशा पुढे गेल्या. मात्र आता या निवडणुकाही घेण्याची तयारी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार 29 मे ते 4 जूनपर्यंत जिल्हा व तालुका पंचायत कार्यक्षेत्रात भेटी देऊन मतदारांची ओळख पटवणे, 5 जून ते 13 जून या कालावधीत मतदार यादीची पडताळणी करणे, 14 जून रोजी कच्ची मतदारयादी प्रसिद्ध करणे, 19 जूनपर्यंत मतदार यादीसंदर्भातील आक्षेप स्वीकारणे आणि यानंतर 27 जून रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान आरक्षण प्रक्रियाही पूर्ण होऊन त्यानंतर निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.
निपाणी तालुक्यातील जि. पं. व ता. पं. मतदारसंघ
5 जि. पं. मतदारसंघ-कारदगा, कोगनोळी, बेडकिहाळ, सौंदलगा, अकोळ तर 20 ता. पं. मतदारसंघ-माणकापूर, कारदगा, मांगूर, कुन्नूर, बेनाडी, आडी, कोगनोळी, बेडकिहाळ, भोज, हुन्नरगी, गळतगा, आप्पाचीवाडी, कुर्ली, सौंदलगा, यमगर्णी, कोडणी, अकोळ, जत्राट, यरनाळ, शिरगुप्पी आहेत.
ग्रा.पं. अध्यक्ष-उपाध्यक्षांचे आरक्षणही जाहीर होणार
गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुका घेण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्याबरोबरच जून-जुलैमध्ये अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये नव्याने अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या आरक्षणाची संख्या निश्चित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे एक-दोन महिन्यात निपाणी तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये नव्याने पदाधिकारी निवडी होणार आहेत. डिसेंबर 2020 मध्ये ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका पार पडल्या. यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर जानेवारी तसेच फेब्रुवारी महिन्यात तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडी करण्यात आल्या. या पदाधिकाऱ्यांचा कालावधी जून तसेच जुलैमध्ये पूर्ण होत आहे. कलावधी पूर्ण होण्यापूर्वीच पुढील अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी नव्याने पदाधिकारी आरक्षणाची संख्या निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही संख्या निश्चित झाल्यानंतर येत्या दोन-तीन आठवड्यात अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये सत्ता स्थापनेच्या तसेच काठावरचे बहुमत असलेल्या ठिकाणी सत्तांतरासाठी हालचाली होण्याची शक्यता आहे. यासाठी आपल्यासारखे आरक्षण यावे म्हणून इच्छुकांकडून नेत्यांच्या भेटीगाठी होणार आहेत. यातून पुन्हा एकदा राजकीय चुरस रंगणार आहे.