राधानगरी / महेश तिरवडे
निपाणी- देवगड या राज्यमार्गाच्या दुरुस्ती कामासाठी राधानगरी ते दाजीपूर हा मार्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दोन महिन्यासाठी बंद करण्यात आला होता.वाहतूक बंद झाल्याने राधानगरीतील सर्व व्यापाऱ्यांच्या परिणाम होऊन व्यवसाय ठप्प झाले होते. ज्या कारणासाठी रस्ता बंद करण्यात आला ते सुरू नसल्याने राधानगरी शहरातील व्यापारी संघटनांकडून रस्ता खुला करण्याची मागणी होत होती. त्या अनुषंगाने हा मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता पण एस टी सेवा बंद होती, मात्र पुन्हा एकदा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार15 दिवसाच्या प्रतिक्षेनंतर निपाणी देवगड या राज्यमार्गावरील एस टी बससेवा गुरुवार पासून सुरू झाल्याने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
१ एप्रिल ते ३१ मे राधानगरी दाजीपूर मार्गवरील जुने पुल, रस्ता रुंदीकरण डांबरीकरण, मोऱ्या बांधकाम दोन महिन्याच्या कालावधीसाठी या मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली होती . ज्या कामासाठी रस्ता बंद करण्यात आला आहे.तसे कोणतेही काम अद्याप दाजीपूर परिसरात चालू नसल्याचे निदर्शनात आल्याने काम चालू नाही तर रस्ता का बंद असा सवाल व्यापारी संघटनांनी उपस्थित केला होता. एस टी व इतर वाहतूक सुरू करण्याच्या मागणीसाठी निदर्शने, आंदोलन केली होती. व्यापारी संघटनेच्या आंदोलनाची दखल घेत गेल्या आठवड्या पासून एस टी सेवा वगळता सर्व वाहतूक सुरू करण्यात आली होती,गुरुवारी सकाळ पासून दाजीपूर राधानगरी मार्ग वाहतुकीसाठी पूर्णता खुला करण्यात आला आहे.या मार्गावरून अवजड वाहनांबरोबर कोकण विभागातून येणाऱ्या सर्व वाहनासाठी मार्ग खुला करण्यात आला आहे. तसेच तळ कोकणात जाणाऱ्या या मार्गावरील एस टी च्या सर्व फेऱ्या पुन्हा एकदा सुरू झाल्याने प्रवासी वर्गातून व स्थानिक नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे,