ब्रिटनने केली मागणी मान्य : महाराष्ट्रासह सर्व भारतासाठी आनंदाची वार्ता
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ज्या शस्त्राने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा शत्रू असणाऱ्या अफझलखानाचा वध केला, ते ‘वाघनख’ भारताला परत मिळणार आहे. सध्या हे शस्त्र ब्रिटनमध्ये आहे. ते परत द्यावे, अशी मागणी भारताने त्या देशाकडे प्रदीर्घ काळापासून केलेली आहे. आता ती ब्रिटनने मान्य केली आहे. यामुळे प्रत्येक मराठी माणसासह सर्व भारतीयांच्या मनात आनंदाचा संचार झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रारंभ केलेल्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना गाडण्यासाठी विजापूरच्या तत्कालिन अदिलशाहीने अफझलखान नावाच्या क्रूर सरदाराला प्रचंड सैन्यानिशी पाठविले होते. तथापि, 1659 मध्ये त्यांनी अफझलखानाला युक्तीने प्रतापगडाखाली बोलावून त्याचा वध केला आणि स्वराज्यावरचे सर्वात मोठे संकट दूर केले. जवळपास पावणेचारशे वर्षांपूर्वी घडलेला हा थरारक प्रसंग प्रत्येक देशभक्तासाठी अभिमानाचा असाच आहे.
भारताची मागणी
या प्रसंगानंतर काही शतकांनी ब्रिटिशांची सत्ता भारतात आली. त्यांनी भारतातील अनेक ऐतिहासिक वस्तू, प्रतिके आणि इतर साधने ब्रिटनमध्ये नेली आणि तेथे त्यांचे जतन केले. या प्रतीकांमध्ये या ‘वाघनख’सदृश शस्त्राचाही समावेश होता. हे शस्त्र महाराष्ट्रासह साऱ्या भारताच्या पराक्रमाचे प्रतीक असल्याने ते भारताला परत मिळावे, अशी मागणी भारताने केली होती. अफझलखान वधाचा दिवस इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे 10 नोव्हेंबर 1659 हा आहे. पण हिंदू तिथीप्रमाणे हा दिवस मानण्याची महाराष्ट्र सरकारची योजना असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
इतिहासाची दिशा पालटली
छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि कुशाग्र बुद्धी यांच्या माध्यमातून अफझलखानासारख्या महाबलाढ्या शत्रूला धाराशायी केल्याने तेव्हा इतिहासाची दिशाच पालटली होती. या घटनेचे मानचिन्ह म्हणून हे ‘वाघनख’ मानले जाते. ते पाहण्याची उत्सुकता प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला आहे. आता त्याची ही इच्छा पूर्ण होणार आहे. लवकरच हे वाघनख भारतात येणार आहे.
नेते, अधिकारी ब्रिटनला जाणार
‘वाघनख’ आणण्यासाठी महाराष्ट्रातील काही नेते आणि सरकारी अधिकारी ब्रिटनला जाणार आहेत. सुधीर मुनगंटीवार, डॉ. विकास खर्गे (संस्कृती विभागाचे मुख्य सचिव), डॉ. तेजस गर्गे (महाराष्ट्राच्या पुरातत्व विभागाच्या निर्देशालयाचे संचालक) इत्यादी मान्यवरांचा या मंडळात समावेश आहे. हे वाघनख समारंभपूर्वक परत आणले जाईल, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली.
कसे आहे वाघनख
वाघनख हे लोखंडी शस्त्र आहे. त्याचा प्रत्यक्ष वाघाच्या नखाशी संबंध नाही. पण ते वाघनखाच्या आकाराचे असल्याने त्याला वाघनख म्हटले जाते. हे शस्त्र ही एक लहान आकाराची तलवार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. ते भारतात परत आणल्यानंतरच त्यासंबंधीची प्रत्यक्ष माहिती सर्वांना मिळणार आहे.
ऐतिहासिक महत्त्वाचे प्रतीक
ड भारतीयांच्या अभिनामाचे प्रतीक असणारे वाघनख लवकरच मिळणार
ड महाराष्ट्राचे काही नेते, अधिकारी ते आणण्यासाठी ब्रिटनमध्ये जाणार
ड छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनख हे ऐतिहासिक अमूल्य प्रतीक
ड ब्रिटनकडे असणारे हे वाघनख परत देण्याची प्रदीर्घकालीन मागणी