जपानमध्ये कंपन्या पुरवत आहेत नवे मालक, सरकारकडून करात मिळतेय सवलत
वृद्ध होत असलेला जपान प्रचंड समृद्ध आहे, परंतु त्याचा औद्योगिक वारसा सांभाळणाऱया व्यक्तींची कमतरता निर्माण झाली आहे. उद्योजक वृद्ध होत असून उत्तराधिकाऱयाशिवाय 6.30 लाख उद्योग 3 वर्षांमध्ये बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. हे सर्व उद्योग नफ्यात सुरू आहेत. हे उद्योग बंद झाल्यास जपानला 14 लाख कोटींचे नुकसान होईल आणि 65 लाख नोकऱया गमवाव्या लागणार आहेत.
या उद्योगांच्या मालकांचे सरासरी वय 62 वर्षे झाले आहे. आता ते निवृत्त होऊ इच्छित असल्याने उत्तराधिकाऱयाचा शोध घेत आहेत. यातील अनेक उद्योजकांना अपत्य नाही, तर काही उद्योजकांच्या मुलांना वडिलांच्या उद्योगात स्वारस्य नाही. या उद्योगांमधील कर्मचारी देखील वयाच्या 5 व्या किंवा 6 व्या दशकात आहेत. याचमुळे ते देखील उद्योगाचे नियंत्रण हाती घेऊ इच्छित नाहीत.
कंपन्यांकडून अनोखी सेवा
वयाच्या या टप्प्यात अनेक उद्योजक स्वतःचा बहरलेला उद्योग मोफत सोपवू पाहत असले तरीही तो सांभाळण्यास कुणी मिळत नसल्याचे चित्र आहे. देशाच्या सुमारे 60 टक्के उद्योगाचे भवितव्य कुणाच्या हाती असणार हेच निश्चित नाही. परंतु जपानमध्ये आता याकरता कंपन्या निर्माण झाल्या आहेत. या कंपन्या अशा उद्योजकांना त्यांचा उद्योग सांभाळण्यासाठी सक्षम उत्तराधिकारी पुरवत आहेत.
निवृत्त होण्याऐवजी….
जपानचे सरकार देखील आता उद्योजकांना निवृत्त होण्याऐवजी उद्योग चालविण्यास सांगत आहे. सरकारने देखील उद्योगाचे खरेदीदार शोधण्यासाठी देशभरात सेवाकेंद्रे स्थापन केली आहेत. नव्या मालकांना अनुदानासह करात सूट दिली जात आहे. खरेदीदार शोधणारी कंपनी एम अँड ए सेंटरचे संचालक सुनियो वाटेनेबल यांनी खरेदीदार शोधण्यात सर्वात मोठी समस्या भावनात्मक असल्याचे सांगितले आहे. स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी आयुष्य वेचलेले लोक तो अनोळखीला विकण्याऐवजी एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला सोपवू पाहतात. जपानच्या व्यापार मंत्रालयानुसार 2021 मध्ये केवळ 2413 उद्योगांनाच खरेदीदार मिळाले. तर त्या वर्षी 44 हजार उद्योग बंद झाले.
शहरांकडे वाढता ओढा
जपानमध्ये अनेक उद्योगांना खरेदीदार न मिळण्याचे मोठे कारण तेथील लोकसंख्येचा मोठय़ा शहरांकडे असलेला ओढा आहे. गावांमध्ये राहणाऱया लोकांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात घटले आहे. त्यामुळे अशा ठाकणी उद्योगाचा विस्तार होण्याची शक्यता मावळत आहे.