जेजुरी / प्रतिनिधी :
राज्यात लक्षवेधी ठरलेल्या जेजुरीच्या मार्तंड देवस्थान विश्वस्त निवडीबाबत दहा दिवसांपासून चाललेल्या ग्रामस्थांच्या आंदोलनाने आता चांगलेच पेट घेतला आहे. लोककला संस्कृती उपासक असलेल्या कोल्हाटी समाजाने ग्रामस्थांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला असून निवडीबाबतीत झालेल्या अन्यायाबद्दल निषेध व्यक्त केला आहे.
जेजुरीच्या नगरपालिकेपासून जेजुरी ग्रामप्रदर्शनापर्यंत समस्त कोल्हाटी समाजाने आपले पारंपरिक वाद्य चिन्ह असलेलला ढोल वाजवला नि आगळ्यावेगळ्या पद्धतीने समाजाने आपला निषेध नोंदवला. या निषेध मोर्चात कोल्हाटी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते दशरथ लाखे, रोहिदास डावलकर, प्रशांत लाखे, देविदास कुदळे, राजेंद्र कुदळे, राजेंद्र डावलकर, संजय कुदळे, किरण दावलकर आदींनी सहभाग नोंदविला.
दरम्यान, विश्वस्थ निवडीत अन्याय झाल्याकडे लक्ष वेधत विविध मार्गाने जेजुरीत ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. दिवटी मशाली पेटवूनही ग्रामस्थांनी आपला निषेध नोंदविला. मयुरेशवर मंडळ कार्यकर्त्यांसह राजवाडा चौक ते नंदिचोक ते भक्तीनिवासपर्यंत पायी पदयात्राही काढण्यात आली. यात ग्रामस्थ नगरसेवक सचिन सोनवणे, अजिंक्य देशमुख, मानकरी अध्यक्ष जालिंदर खोमणे, माजी देवस्थान विश्वस्त संदीप जगताप, मानकरी शैलेश राऊत, सामाजिक कार्यकर्ते सचिन खोमणे, उमेश जगताप आदी मान्यवरांनी भाग घेतला.