रियर ऍडमिरल विक्रम मेनन यांची माहिती
प्रतिनिधी /वास्को
केंद्र सरकारची अग्नीपथ योजना हे एक धाडसी पाऊल असून देशाच्या सुरक्षा क्षेत्रात बदल घडवणारी आहे. राष्ट्रबांधणीसाठी ही एक सर्वोत्कृष्ठ योजना आहे. अग्नीपथमध्ये सहभागी होणारे अग्नीवीर एक उत्कृष्ठ प्रशिक्षण आणि अनुभव घेऊन त्याचा लाभ समाजाला देऊ शकतात. गोव्यात या योजनेविषयी शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून युवकांमध्ये जागृती करण्यात येईल अशी माहिती भारतीय नौदलाच्या गोवा विभागाचे ध्वजाधिकारी रियर ऍडमिरल विक्रम मेनन यांनी दिली.
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी नवी दिल्लीत जाहीर केलेल्या योजनेविषयी नौदलाच्या गोवा विभागाचे ध्वजाधिकारी रियर ऍडमिरल विक्रम मेनन यांनी आयएनएस गोमंतकमध्ये पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत कोमोडोर आशिष गोयल तसेच कोमोडोर व्ही.के.गुप्ता उपस्थित होते.
रियर ऍडमिरल विक्रम मेनन म्हणाले की अग्नीपथ योजना ही बदल घडवून आणणारी योजना असून सुरक्षा यंत्रणेबरोबरच समाजालाही त्याचा लाभ होईल. ही योजना दूरदृष्टी ठेऊन अमलात आणण्यात आलेली आहे. त्याचे देशाला दिर्घकालीन लाभ अपेक्षीत आहेत. तंत्रज्ञानाची जाणीव असलेले युवक या योजनेव्दारे संरक्षण दलाकडे वळतील. काहींना संरक्षण दलात संधी मिळेल तर इतर प्रशिक्षीत युवक समाजातील विविध किंवा संबंधीत क्षेत्रात अग्नीपथमध्ये चार वर्षात मिळवलेले ज्ञान व अनुभवाचा वापर करतील. मिळवलेले ज्ञान ते समाजाला वाटू शकतील. खासगी अद्योगिक क्षेत्रातही त्यांच्यासाठी संधी उपलब्ध असतील.
गोव्यात पूर्वीपासून संरक्षण दलांचा सहवास आहे. संरक्षण दलाचे अनेक उपक्रम गोव्यात घडत असतात. गोव्यातील युवकांना अग्नीपथ योजनेविषयी सविस्तर माहिती शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून दिली जाईल. युवकांमध्ये जागृती केली जाईल असे ध्वजाधिकारी रियर ऍडमिरल विक्रम मेनन म्हणाले.
अग्नीपथ म्हणजे मुळ लष्करी प्रशिक्षण आहे. ज्यामुळे युवकांसमोर विविध संधी उपलब्ध होतील. आपले भविष्य सक्षम करण्यासही त्यांना या प्रशिक्षणव्दारे मदत होईल. देशाप्रती आपल्या कर्तव्याची भावनाही त्यांच्या जागृत होईल. भविष्यात या योजनेमध्ये देशातील तरूणींनाही संधी उपलब्ध होती अशी माहिती रियर ऍडमिरल मेनन यांनी दिली.