‘एनडीए’सोबतचे संबंध संपवले, बैठकीत एकमताने ठराव मंजूर
वृत्तसंस्था/ चेन्नई
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला मोठा धक्का देत अण्णाद्रमुकने सोमवारी भाजप आघाडीपासून वेगळे होण्याची घोषणा केली. याबाबत पक्षाने एकमताने ठराव मंजूर केला. अण्णाद्रमुक आजपासून भाजप आणि एनडीए युतीशी सर्व संबंध तोडत आहे. भाजपचे राज्य नेतृत्व गेल्या एक वर्षापासून आमचे माजी नेते, आमचे सरचिटणीस ईपीएस (एडाप•ाr पलानीस्वामी) आणि आमच्या कार्यकर्त्यांबद्दल सतत अनावश्यक टिप्पणी करत असल्याचा आरोप अण्णाद्रमुकचे उप-संयोजक केपी मुनुसामी यांनी निर्णयाची घोषणा करताना केला. यासोबतच पक्षाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी वेगळ्या आघाडीचे नेतृत्व करणार असल्याचे सांगितले.
तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकने भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबतचे संबंध संपवले आहेत. पक्षाचे उप-संयोजक के. पी. मुनुसामी यांनी ही अधिकृत घोषणा केली. यापूर्वी एआयएडीएमकेने आपली भाजपसोबत कोणतीही युती नसून निवडणुकीच्या वेळी युतीचा विचार केला जाईल, असे स्पष्ट केले होते. एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते डी जयकुमार यांनी हे वक्तव्य केले होते. हे त्यांचे वैयक्तिक विधान नसून पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आता पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठकीअंती भाजपसोबत न राहण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच आता अण्णाद्रमुक 2024 च्या लोकसभा निवडणुकीत वेगळ्या आघाडीचे नेतृत्व करणार असल्याचे स्पष्टीकरणही देण्यात आले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय पक्षाचे प्रमुख पलानीस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला.
डी जयकुमार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्यावर निशाणा साधला होता. अण्णामलाई यांनी केलेले आरोप आपले पक्ष कार्यकर्ते सहन करणार नाहीत, असे ते म्हणाले होते. अण्णामलाई यांनी आपल्या पक्षनेत्यांच्या विरोधात वक्तव्ये करण्याबरोबरच दिवंगत माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांच्यावर टीका केल्यामुळे अण्णाद्रमुकनेही आक्षेप घेतला होता. डी जयकुमार यांनी अण्णामलाई भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी योग्य नसल्याचेही म्हटले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी नुकतेच राज्याचे धार्मिक व्यवहार मंत्री पी. के. शेखर बाबू यांच्याविरोधात आंदोलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविरोधात भाष्य केले होते. त्या कार्यक्रमात पी. के. शेखर बाबू देखील उपस्थित होते.