आपची मागणी : खानापूर तहसीलदारांना निवेदन
प्रतिनिधी /खानापूर
केंद्र सरकारने प्रत्येक राज्यासाठी एम्स हॉस्पिटल उभारण्याची योजना आखली आहे. एम्स हॉस्पिटल बेळगाव येथे उभारण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पक्षाच्यावतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन खानापूर तहसीलदारांना देण्यात आले.
कर्नाटक राज्याला एम्स हॉस्पिटल मंजूर झाले आहे. हे हॉस्पिटल बेंगळूर येथे होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बेंगळूर येथे अनेक दवाखाने आहेत. उत्तर कर्नाटकात वैद्यकीय सेवेची गरज आहे. बेळगाव जिल्हा व्याप्तीने मोठा असून या जिल्हय़ाचा संपर्क इतर राज्यांशीही असल्याने एम्स हॉस्पिटल बेळगावात होणे गरजेचे आहे. यासाठी केंद्राने व राज्य सरकारने बेळगाव येथे एम्स हॉस्पिटल उभारण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील, शिवाजी गुंजीकर, गोपाळ गुरव, सहदेव पाटील, रमेश कौंदलकर, लक्ष्मण शेंदाळे आदी उपस्थित होते.
दुर्गम भागात धान्यपुरवठा करा
दुर्गम भागात शासनमान्य धान्य पुरवठा करण्यात यावा, या मागणीचे निवेदन यावेळी त्यांना देण्यात आले. तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गावात शासनाच्या रेशन दुकानांतून धान्य वाटप करण्यात येते. मात्र, काही गावात एकच दुकान असल्याने दुर्गम भागातील लोकांना ते सोयीचे होत नाही. बायोमेट्रिक पद्धत असल्याने आधी ठसे देण्यासाठी यावे लागते. त्यानंतर पुन्हा धान्य नेण्यासाठी यावे लागते. दुर्गम भागातील लोकांना जंगलातून पायपीट करावी लागत आहे. यासाठी धान्य पुरवठा विभागाने दुर्गम भागातील गावात धान्याचा पुरवठा करावा, अशी मागणी आम आदमी पक्षाच्यावतीने करण्यात आली.
तालुक्यातील निलावडे येथील दुकानातून कोकणवाडा, जांबोटीतील कापोली के. सी. आणि कौलापूरवाडा, तीर्थकुंडये, विजयनगर, विश्रांतवाडी येथील ओत्तोळी या गावात रेशन पुरवठा करण्यात यावा, असे लेखी निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी भैरू पाटील, महादेव कवळेकर, सागर देसाई, सहदेव पाटील आदी उपस्थित होते.