संपूर्ण राज्यात पावसासह विजांचाही कडकडाट : वाळवंटी नदीच्या पाण्याचा स्तर वाढला,24 तासांत सर्वाधिक पाऊस पणजीत
पणजी : बुधवारी रात्री उशिरा सुरू झालेला पाऊस गुऊवारी पहाटेपर्यंत संपूर्ण गोव्यात कोसळत राहिला. गुऊवारी राजधानी पणजी शहराला पावसाने झोडपले. मान्सून अति क्रियाशील बनला असून 25 सप्टेंबरपर्यंत गोव्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुसळधार पावसातच गणेश चतुर्थीचा उत्सव धुमधडाक्यात सुरू आहे. बुधवारी राज्याला झोडपून काढल्यानंतर गुऊवारी जोरदार पाऊस पडेल असा कोणताही इशारा हवामान खात्याने दिला नव्हता. तरीही गुऊवारी दिवसभर राज्यात सर्वत्र जोरदार तर काही भागात मुसळधार पाऊस पडल्यानंतर हवामान खात्याने दुपारी दिलेल्या माहितीनुसार गुऊवारी मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज पाऊस सुरू झाल्यावर दिला. त्यानंतर पुढील चार दिवस गोव्यात मुसळधार पाऊस कोसळणार असाही इशारा दिला. त्यामुळे 5 दिवसांच्या गणेश विसर्जनाच्यावेळी मुसळधार पावसाला तोंड द्यावे लागणार आहे. बुधवारी दिवसभर संपूर्ण गोव्यात अधूनमधून जोरदार पाऊस पडत होता. रात्री दीड दिवसांच्या गणेश विसर्जनावेळी पाऊस अधिकच आक्रमक बनला. हा पाऊस पहाटेपर्यंत चालू होता. दिवसभर ढगाळ हवामान राहिले त्यामुळे अंधारल्यासारखे वाटत होते. सध्या पडणारा पाऊस हा जणू काही परतीच्या पावसाप्रमाणे मुसळधारपणे कोसळत आहे. सोबत विजांचा कडकडाटही चालू होता.
अंजुणे धरणाचे दरवाजे किंचित उघडले
प्राप्त माहितीनुसार अंजुणे धरण क्षेत्रात सध्या जोरदार पाऊस चालू आहे. धरणाची सर्वाधिक क्षमता 93.20 मीटर एवढी असून ती ओतप्रोत भरल्यानंतर बुधवारपासून धरणाचे चारही दरवाजे किंचित खुले करुन पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गुऊवारी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने पाण्याचा प्रवाह धरणात वाढल्यामुळे दरवाजे आणखी थोडे वर कऊन जोरदार पाण्याचा विसर्ग केला. त्यामुळे वाळवंटीच्या पाण्याची पातळी किंचित वाढली.
चोवीस तासांत सर्वाधिक पाऊस पणजीत
गेल्या 24 तासांत राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळला. गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक 3.5 इंच पाऊस पणजीत नोंदविला आहे. अन्य ठिकाणी पडलेला पाऊस इंचाप्रमाणे म्हापसा 1.5, पेडणे 1.25, फोंडा 2, जुने गोवे 1, सांखळी 2.5, वाळपई अर्धा इंच, काणकोण पाऊण, मुरगाव 2.5, सांगे अर्धा इंच पाऊस पडला.
अधिकृत पावसाळा संपणार 30 रोजी
मोसमातील पावसाची अधिकृत नोंद 30 सप्टेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. अद्याप 8 दिवस शिल्लक असून सध्या गोव्यात सर्वाधिक पावसाची नोंद केपे येथे झालेली आहे. केपे येथे आतापर्यंत 135 इंच नोंद झालेली आहे. सांगेमध्ये 133 इंच पाऊस पडला. वाळपई 126 इंच, फोंडा येथे 128 इंच, पेडणे येथे 122 इंच तर सांखळी येथे 121 इंच पावसाची यंदाच्या मोसमात नोंद झालेली आहे.