वैमानिकाकडून विमान शॉपिंग सेंटरवर पाडविण्याची धमकी
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेच्या मिसिसिपीमध्ये एका विमानाचे अपहरण झाल्याचे वृत्त आहे. वैमानिक विमानाला शॉपिंग सेंटरवर पाडविण्याची धमकी देत होता. एका वैमानिकाने या विमानाला मिसिसिपीच्या टुपेलो येथील एका वॉलमार्ट स्टोअरवर जाणूनबुजून पाडविण्याची धमकी दिली आहे.
वैमानिकाकडून विमान पाडविण्याची धमकी मिळाल्यावर संबंधित परिसरातील लोकांना सतर्क करण्यात आले आहे. पोलिसांनी मिसिसिपी येथील स्टोअरही रिकामी करविण्यात आले आहे. टुपेलो शहरात सुमारे 40 हजार जणांचे वास्तव्य आहे.
टुपेलोमध्ये कायदा-अंमलबजावणी यंत्रणा अन् आपत्कालीन सेवेच्या कर्मचाऱयांना हायअलर्ट राहण्यास सांगण्यात आले आहे. तर याचदरम्यान अधिकारी वैमानिकाच्या संपर्कात असून त्याचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका आकाराने छोटे असलेल्या खासगी विमानासह वैमानिक शनिवारी टुपेलोच्या आकाशात घिरटय़ा घालत होता. तसेच त्याच्याकडून वॉलमार्ट स्टोअरवर विमान पाडविण्याची धमकी देण्यात आली होती.
वैमानिकाने बीचक्राफ्ट किंग एअर-90 नावाचे विमान टुपेलो विमानतळावरून चोरले आहे. हे एक डबल इंजिन असलेले 9 आसनी विमान आहे. वैमानिकाने आपत्कालीन क्रमांक 911 वर कॉल करत वॉलमार्ट स्टोअरवर ते पाडविण्याची धमकी दिली होती. वैमानिकाचे वय 29 वर्षे असून तो वॉलमार्टचाच कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले. वैमानिकाचा या कृत्यामागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.