तुम्ही कार फार तर ट्रक चोरीला गेल्याचे ऐकले असेल. परंतु इस्रायलमध्ये चोरांनी सैन्याचा रणगाडाच पळविला आणि याचा कुणाला सुगावा देखील लागला नाही. हा रणगाडा एलिकिम इंटरचेंजनजीक इस्रायल डिफेन्स फोर्सेसच्या प्रशिक्षण तळावर ठेवण्यात आला होता. हा भाग सर्वसामान्य जनतेसाठी पूर्णपणे बंद असतो. तसेच या क्षेत्रात कुणालाच सहजपणे प्रवेश मिळत नाही. तरीही चोर या क्षेत्रात शिरले आणि त्यांनी अत्यंत सहजपणे येथून रणगाडा चोरला आहे.
ही घटना उघडकीस आल्यावर अधिकाऱ्यांना धक्काच बसला. सैन्याला हा रणगाडा शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर सापडला आहे. हा रणगाडा मर्कवा 2 प्रकारातील होता आणि याचे वजन सुमारे 65 टन होते. हा रणगाडा गायब झाल्याचे कळताच शहरात खळबळ उडाली. सैन्यतळावर रणगाडा चोरीला जाण्याची घटना किरकोळ नव्हती. याचमुळे त्वरित संरक्षण मंत्रालयाला याची कल्पना देण्यात आली. अनेक यंत्रणा या रणगाड्याच्या शोधात सामील झाल्या.
इस्रायलच्या सैन्य इतिहासात ही अनोखी घटना मानली जात आहे. रणगाडा अखेर चोरीला कसा गेला याची चौकशी आता यंत्रणांकडून केली जातेय. अत्यंत कडेकोट सुरक्षा अन् कॅमेऱ्यांच्या देखरेखीत हा रणगाडा गायब कसा करण्यात आला हे आता तपासून पाहिले जात आहे. रणगाडा 20 किलोमीटर अंतरापर्यंत नेण्यात आला तरीही पोलिसांना याचा सुगावा कसा लागला नाही. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. सरकारविरोधी निदर्शनासाठी हा रणगाडा चोरण्यात आला होता असे प्रारंभिक तपासात आढळून आले आहे. रस्त्यांवर रणगाडा नेत त्यावर उभे राहून सरकारविरोधी घोषणा देण्याचा आरोपीचा प्रयत्न होता.