भारतीय वंशाच्या व्यक्तीचा यथोचित गौरव
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
भारतीय वंशाचे अजय बंगा यांनी जागतिक बँकेचे नवे अध्यक्ष म्हणून शनिवारी सूत्रे स्वीकारले. त्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांना या पदासाठी नामांकित केले होते. मास्टरकार्डचे सीईओ असलेले बंगा हे जागतिक बँकेचे अध्यक्ष होणारे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती ठरले आहेत. तसेच जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) या दोन जागतिक वित्तीय संस्थांचे अध्यक्षपद भूषविणारे ते पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती ठरले आहेत. यापूर्वी बंगा हे खाजगी इक्विटी फंड जनरल अटलांटिकचेही उपाध्यक्ष होते.
अजय बंगा यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1959 रोजी पुण्यात झाला. त्यांचे वडील हरभजन सिंग बंगा हे भारतीय लष्करात लेफ्टनंट जनरल होते. हिंदुस्थान युनिलिव्हरचे माजी अध्यक्ष मनविंदर सिंग बंगा यांचे ते भाऊ आहेत. अजय बंगा यांचे शालेय शिक्षण जालंधर आणि शिमला येथे झाले. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी आणि आयआयएम अहमदाबादमधून एमबीए केले आहे. 2016 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले आहे. बंगा यांनी भारतात पिझ्झा हट आणि केएफसीच्या लॉन्चिंगमध्ये प्रमुख भूमिका बजावली होती. बंगा 1996 मध्ये सिटीग्रुपचे मार्केटिंग हेड बनले. 2000 मध्ये सिटी फायनान्शियलचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली होते. तर 2009 मध्ये मास्टरकार्डचे सीईओ बनले आणि त्यांच्या मार्केटिंग धोरणामुळे मास्टरकार्ड तऊणांमध्ये ते लोकप्रिय झाले. 2012 मध्ये प्रसिद्ध मासिक फॉर्च्युनने बंगा यांची ‘पॉवरफुल इंडस्ट्रियालिस्ट-2012’ म्हणून निवड केली.