अध्याय सत्ताविसावा
भगवंत म्हणतात, धनवंत भक्तांनी देवळे रावळे बांधावीत, सभोवती रोपवाटिका लावाव्यात. रोजच्या पूजेसाठी लागणाऱ्या फुलांच्या झाडांची जोपासना करावी तसेच देवाची यात्रा चालावी, बहुजनसमाज जमावा, वार्षिक पर्वात महापूजा व्हावी व ती अखंड चालावी. दररोजची पूजा नेहमी चालू राहावी, म्हणून शेती, जमीन, गाव देवाच्या नावाने करून द्यावी. जे असे करतील त्यांना माझ्यासारख्या ऐश्वर्याची प्राप्ती होईल. देवळात माझ्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने पृथ्वीचे एकछत्री राज्य, मंदिर बांधल्याने त्रैलोक्याचे राज्य, पूजा इत्यादींची व्यवस्था केल्याने ब्रह्मलोक आणि हे तीनही केल्याने माझी समानता प्राप्त होते. असे साधक मनात काही उद्देश ठेवून किंवा काही अपेक्षा करून हे सर्व करत असले, तरी ते इच्छिलेल्या लोकाला जातात. निष्काम भक्त भगवंताना फार प्रिय असतात. अशा भक्तांना ते आपलं सर्वस्व द्यायला तयार असतात. ते म्हणतात, जो निष्कामभावाने माझी पूजा करतो, त्याला माझा भक्तीयोग प्राप्त होतो आणि त्या निरपेक्ष भक्तीयोगाने तो मलाच प्राप्त करून घेतो. ते देहात असतानाच माझे रूप होतात. त्यामुळे त्यांच्यात व माझ्यात मुळीच भेद नसतो. याप्रमाणे जो निष्काम भक्ती करतो, तो चराचरामध्ये धन्य होय. निष्काम भक्ती करणारा चराचरामध्ये धन्य होत असताना त्यांना त्रास देणारे लोकही असतात. अशा लोकांना देवळात चाललेली पूजाअर्चा, होमहवन सहन होत नाही. त्यांना तो पैशाचा अपव्यय वाटत असतो. म्हणून ते भक्ताने, पुजाऱ्यांना दिलेली जमीन, धन हरण करतात. त्याचा परिणाम म्हणून ते अघोर नरकात पडतात. जे लोक अशा कामांमध्ये मदत करतात, प्रेरणा देतात किंवा सहमत होतात तेसुद्धा मरणानंतर वरील व्यक्तीप्रमाणेच त्या कर्माच्या फळाचे भागीदार होतात आणि त्यांचा सहभाग त्यात अधिक असेल, तर फळसुद्धा त्यांना अधिक मिळते. उद्धवा! ते जन्ममरणाच्या भोवऱ्यात सापडून खरोखर तेच फळ मरून मरून पुन: पुन्हा भोगीत राहतात. माझ्या प्राप्तीची जर इच्छा असेल तर मनाला अकर्म शिवू देऊ नये. सहजसुद्धा अधर्मकर्त्याची गोष्ट काढू नये. कोणाचे दोष पाहू नयेत, कोणाचे मर्मी भाषण बोलू नये आणि प्राणिमात्राचा द्वेष कधीच करू नये. दुसऱ्याची निंदा कधी ऐकू नये, दुसऱ्याचे दोष उच्चारू नयेत, अधर्माच्या भाषणामध्ये कधीही कोणाशी मिसळू नये. त्रिभुवनातील सारे पातक ज्याला हटकून आपल्या माथी घ्यावयाचे असेल, त्याने आपल्या तोंडाने साधूची यथेच्छ निंदा करावी. साऱ्या दु:खाच्या राशी आवश्य आपल्यापाशी याव्यात, अशी ज्याच्या मनाला आवड असेल, त्याने आवश्य ब्रह्मद्वेष करावा. सारा वेळ व्यर्थ जावा असे ज्याच्या मनाला आवडत असेल, त्याने रात्रंदिवस सोंगट्यांचे वगैरे डाव मांडावेत. मी जो हृदयात राहणारा आत्माराम, स्वत:सिद्ध परब्रह्म, तो मी दुर्गम होण्यासाठीच जगाला अधर्मकर्म लागले आहे ते कर्माकर्म नष्ट करण्याचे वर्म फार सोपे आहे. पुरुषोत्तम, अच्युत, रामराम असे अखंड नामस्मरण करीत राहावे. जेथे हरिनामाचा गजर चालतो, तेथे कर्माकर्माच्या राशी साफ जळून जातात. त्यांची चिमटीभर राखसुद्धा राहात नाही. इतके हरी नाम पवित्र आहे. ह्या भागवतातील मतितार्थ लक्षात घेतला असता हरीचे नाम अत्यंत समर्थ आहे, असे पराकाष्ठेचे वर्णन अच्युताने स्वमुखाने केलेले आहे. संकल्पविकल्पामुळेच लोकांना दृढबंधन प्राप्त झाले आहे असे समज. त्या संसारबंधनाचे छेदन करावयाला एक जनार्दनाचे नामच समर्थ आहे. केवढेही भवभय असले तरी जनार्दनाचे नाम त्याचा नाश करून टाकते. ते नाम जो अंतर-प्रेमाने स्मरतो, तो स्वत:च पुरुषोत्तम होतो. स्वत:च पूर्ण ब्रह्म कसे व्हावे, याविषयींचं गोड निरूपण अठ्ठाविसाव्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण उद्धवाला सांगतील. प्राण गेला तरी सोडवणार नाही अशी ह्या कथेची गोडी असून, ते ऐकताच ब्रह्मभाव उत्पन्न होईल आणि ते निरूपण अठ्ठाविसाव्यात ब्रह्मानंदाला जाऊन पोचेल. हा अठ्ठाविसावा अध्याय म्हणजे ब्रह्मसुखाची साठवण आहे. हे कृष्ण-उद्धवाचे आत्मज्ञान आहे. एकनाथ जनार्दनाला शरण होऊन विनंती करतो की, कृपाकरून श्रोत्यांनी ह्याकडे लक्ष द्यावे.
अध्याय सत्ताविसावा समाप्त