खवय्यांची चंगळ, नागरिकांकडून पसंती मात्र, दर जादा
बेळगाव : दमदार पावसाला सुरुवात झाल्यानंतर नैसर्गिक अळंबी बाजारात विक्रीसाठी दाखल होऊ लागली आहेत. अळंबीची चव चाखण्यासाठी नागरिकांकडून खरेदी होऊ लागली आहे. समादेवी गल्ली, नरगुंदकर भावे चौकात शेतकऱ्यांकडून किरकोळ प्रमाणात अळंबीची विक्री होऊ लागली आहे. अळंबीचे दर मात्र आवाक्याबाहेर असल्याचे दिसत आहेत. दरवर्षी दमदार पावसाला सुरुवात झाल्यानंतर रानावनात, माळरानावर आणि शेतीच्या बांधावर या अळंबींची उगवण होते. यंदाही पाऊस झाल्यानंतर अळंबींची उगवण सुरू झाली आहे, अशी अळंबी आता बाजारात विक्रीसाठी येऊ लागली आहेत. आरोग्याला उत्तम आणि खायला चविष्ट असणाऱ्या अळंबीची खरेदी नागरिकांकडून होऊ लागली आहे. 200 ते 400 रुपये वाटा या प्रमाणे विक्री सुरू आहे. सहसा अळंबी मिळत नाहीत. मात्र, हंगामानुसार बाजारात आलेल्या अळंबीची विक्री होऊ लागली आहे. नैसर्गिक अळंबी कमी प्रमाणात असल्याने दर अधिक असतो. चिकनपेक्षा अळंब्यांचा दर अधिक असल्याचे दिसत आहे. मात्र, चव चाखण्यासाठी खवय्यांकडून ती खरेदी केली जात आहेत.