ऑन्स जेबॉरचा स्वप्नभंग, सित्सिपस, कॅरेन खचानोव्हचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ पॅरिस
ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारी पहिली आफ्रिकन खेळाडू होण्याचे ऑन्स जेबॉरचे स्वप्न अखेर धुळीस मिळाले असून ट्युनिशियाच्या या सातव्या मानांकित खेळाडूला महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलच्या बियाट्रिझ हदाद माइयाकडून पराभूत व्हावे लागले. पुरुष एकेरीत कार्लोस अल्कारेझने ग्रीसच्या सित्सिपसचे आव्हान संपुष्टात आणत उपांत्य फेरी गाठली तर जोकोविचने खचानोव्हला नमवित शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले आहे.
चौदाव्या मानांकित ब्रियाट्रिझ हदाद माइयाने जेबॉरवर तीन सेट्सच्या लढतीत 3-6, 7-6 (7-5), 6-1 अशी मात करीत उपांत्य फेरी गाठली. एखाद्या ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठणारी माइया ही 1968 नंतरची पहिली ब्राझिलियन टेनिसपटू आहे. 1968 मध्ये मारिया ब्युनोने असा पराक्रम केला होता. ओपन युग सुरू झाल्यापासून माइया ही या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी ब्राझीलची पहिलीच महिला आहे. वर्षभरात तिसऱ्यांदा ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठण्याची जेबॉरची आशा मात्र संपुष्टात आली. माइयाचे कडवे आव्हान तिला मोडून काढता आले नाही. स्लॅमच्या उपांत्य फेरीत माइयाने पहिल्यांदाच प्रवेश मिळविला आहे. तिला आता नवा इतिहास निर्माण करण्याची संधी मिळाली आहे.
पुरुष एकेरीत जागतिक अग्रमानांकित कार्लोस अल्कारेझने दोन वेळचा ग्रँडस्लॅम विजेता स्टेफानोस सित्सिपसचे आव्हान 6-2, 6-1, 7-6 (7-5) असे संपुष्टात आणत उपांत्य फेरी गाठली. शुक्रवारी त्याची उपांत्य लढत सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचशी होईल. तिसरे मानांकन मिळालेल्या जोकोविचने रशियाच्या 11 व्या मानांकित कॅरेन खचानोव्हचा प्4-6, 7-6 (7-0), 6-2, 6-4 असा पराभव करून 12 व्यांदा या स्पर्धेच्या शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. दोन तास ही लढत रंगली होती. पण जोकोविचला या सामन्यात सर्वोत्तम खेळ करता आला नाही. तरीही तो विजय मिळविण्यात यशस्वी ठरला.