शिख समुदायात मोठा आक्रोश : पाकिस्तानातील धक्कादायक घटना
वृत्तसंस्था/ कर्तारपूर
पाकिस्तानातील कर्तारपूर साहिब गुरुद्वाराच्या पवित्र स्थळात मद्यपान आणि मांसाहाराची पार्टी आयोजित झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शिख समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या असून ते याप्रकरणी चौकशीची मागणी करत आहेत. कर्तारपूर साहिब या पवित्र तीर्थस्थळी हा प्रकार घडल्याने जगभरातील शीख धर्मीयांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पार्टीदरम्यान मद्य अन् मांसाहारी पदार्थ वाढले गेले, हा प्रकार शिख समुदायाच्या श्रद्धेला धक्का पोहोचविणारा असल्याचा आरोप दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे महासचिव जगदीप सिंह काहलों यांनी केला आहे. काहलों यांनी या घटनेची कठोर शब्दांत निंदा करत पाकिस्तान सरकारला याप्रकरणी जबाबदार लोकांच्या विरोधात कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
कर्तारपूर साहिबमध्ये मद्य आणि मांसाहारयुक्त पार्टी झाल्याचे दर्शविणारा एक व्हिडिओ उपलब्ध झाला आहे. तेथे डान्स पार्टी करण्यात आली असून यावेळी मद्य अन् मांसाहारी पदार्थ पुरविण्यात आल्याचा दावा भाजप नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी केला आहे. कर्तारपूर साहिब हे शीख समुदायासाठी अत्यंत पवित्र स्थळ आहे. यामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर शीख समुदायात मोठा आक्रोश निर्माण झाला आहे.