नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जी-20 परिषदेतील सदस्य देशांच्या अर्थमंत्र्यांनी युक्रेन युद्धासाठी रशियाला जबाबदार धरले असून रशियाचा निषेध केला आहे. या संदर्भात सर्व सदस्य देशांनी एक निवेदन तयार केले असून या लेखी निवेदनावर रशिया आणि चीन वगळता सर्व सदस्य देशांच्या स्वाक्षऱया आहेत, अशी माहिती या परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविणाऱया भारताने दिली आहे. या निवेदनावर सर्व देशांची सहमती न झाल्याने नियमाप्रमाणे ते जाहीर केले जाणार नाही. मात्र, अध्यक्ष या नात्याने भारत या संबंधातील सारांश जाहीर करणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. गेले दोन दिवस अर्थमंत्र्यांची ही परिषद झाली होती. भारताच्या अध्यक्षतेत झालेल्या या प्रथम अर्थमंत्री परिषदेचे अध्यक्षस्थान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भूषवले होते. अनेक महत्वाच्या विषयांवर परिषदेत चर्चा झाली.