सर्व वयोगटाचे मुस्लीमधर्मीय करू शकणार यात्रा ः सौदी सरकारने प्रवेशसंख्येवरील मर्यादाही हटविली
@ वृत्तसंस्था / रियाध
कोरोना संकटादरम्यान हज यात्रेकरता लागू करण्यात आलेले निर्बंध सौदी अरेबियाने हटविले आहेत. तसेच हजसाठीची वयोमर्यादाही हटविण्यात आली आहे. म्हणजेच आता सर्व वयोगटातील व्यक्ती हजयात्रा करू शकणार आहे. याचबरोबर सौदी अरेबियाकडून भाविकांच्या संख्येवरील मर्यादाही मागे घेण्यात आली आहे. हे निर्बंध कोरोना संक्रमण टाळण्यासाठी लागू करण्यात आले होते. भारताला यावेळी पावणे दोन लाख भाविकांचा कोटा मिळाला आहे.
सौदी अरेबियाचे हज आणि उमराह मंत्री तौफीक अल-रबिया यांनी 2023 मध्ये हज यात्रा करणाऱया लोकांची संख्या कोरोना पूर्वीप्रमाणेच राहणार असल्याचे म्हटले आहे. 2019 मध्ये जगभरातील 25 लाख लोकांनी हज यात्रा केली होती. तर कोरोना संकटामुळे 2020 मध्ये हा आकडा कमी होत एक हजार राहिला होता. कोरोना संकटकाळात केवळ सौदी अरेबियाचे मूळ रहिवासी असलेल्या तसेच 20-50 वयोगटातील लोकांना हजयात्रा करण्याची अनुमती होती.
2021 मध्ये काही निर्बंधांसह 60 हजार जणांना हज यात्रा करण्याची अनुमती देण्यात आली होती. परंतु हे सर्वजण सौदी अरेबियाचे नागरिक होते. तसेच त्यांनी कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते. 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांना हज यात्रा करण्याची मुभा देण्यात आली होती, परंतु पूर्वीच्या तुलनेत ही संख्या कमी होती. यादरम्यान एकूण 10 लाख लोक हजयात्रेत सामील झाले होते.
हजसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू
हजयात्रेसाठी आता ऑनलाईन अर्ज करता येणार असल्याची माहिती सौदी अरेबियाचे मंत्री अल-रबिया यांनी अलिकडेच दिली आहे. हजयात्रेसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार असून याकरता संबंधितांकडे जुलैच्या मध्यापर्यंत वैध राष्ट्रीय किंवा निवासी ओळखपत्र असणे आवश्यक आहे. तसेच कोरोना आणि इन्फ्लुएंजाचे लसीकरण प्रमाणपत्र बाळगणे अनिवार्य आहे. हजयात्रेकरता हज मिनिस्टरीच्या वेबसाइटवर जात अर्ज करता येणार आहे. एकाहून अधिक अर्जांसाठी एकाच मोबाईल क्रमांकाचा वापर न करण्याची सूचना करण्यात आली आहे. सौदी अरेबियाकडून यावेळी हजयात्रेकरता अनेक सुविधांची घोषणा करण्यात आली आहे.