केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी एकत्र लढूया : मगोनेतेडॉ.भाटीकरयांचेआवाहन
प्रतिनिधी /फोंडा
म्हादईच्या प्रश्नावर गोव्याला न्याय मिळण्यासाठी विविध आघाडय़ांवर लढा द्यावा लागेल. त्यासाठी राजकीय मुत्सद्दीपणा कामी येणार आहे. केंद्र सरकारला गोव्याची बाजू पटवून देण्यासाठी प्रभावी राजकीय डावपेच आखावे लागतील. म्हादईसाठी प्रत्येक राजकीय पक्ष व सामाजिक संघटना मैदानात उतरल्या आहेत. सर्वांचे ध्येय एकच असल्याने गोव्याच्या अस्थित्त्वाच्या या लढाईत संघटीत ताकद दाखविण्याचे आवाहन मगो नेते डॉ. केतन भाटीकर यांनी केले आहे.
म्हादईवर ओढवलेल्या या संकटाची पूर्वकल्पना देत, मगो पक्षाने सन 2018 पासून व्यापक जनजागृती व आंदोलन सुरु केले होते. त्यासाठी खांडेपार येथे कलश पूजा, म्हादईच्या उगम स्थानावर पूजा, डिचोली तालुक्यात पदयात्रा तसेच इतर विविध माध्यमातून व्यापक जागृती केलेली आहे. त्यावेळी या आंदोलनाला सर्व पक्षीय पाठिंबा मिळाला असता तर केंद्र सरकारने कर्नाटकला पाणी वळविण्यासाठी परवाना दिला नसता. म्हादईचा लढा हा कुठल्याही एका राजकीय पक्षाचा नसून समस्त गोमंतकीयांच्या भवितव्याची व अस्तित्वाची लढाई आहे. सरकार सर्वोच्च न्यायालयात खटला लढत आहे. पण त्यावर न थांबता, केंद्र सरकारवर दबाव वाढविण्याची गरज आहे. या राजकीय लढय़ात मगो पक्ष भाजपासोबत ठाम उभा आहे. त्याला इतर पक्षांचे संघटीत पाठबळ लाभल्यास गोव्याचे निश्चित बळ वाढेल, असे डॉ. भाटीकर यांनी सांगितले.
मगो पक्षाचा भाजपाला भक्कम पाठिंबा
मगो पक्षाचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांनी 2018 सालीच म्हादईसाठी जनआंदोलनाची हाक देत, कर्नाटकने म्हादईचे 40 टक्के पाणी वळविल्याचे जाहीरपणे सांगितले होते. पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनीही समस्त गोमंतकीयांना म्हादईसाठी एकत्र येण्याचे आवाहन करीत विविध मतदार संघांतील जनतेपर्यंत हा विषय नेला होता. फोंडय़ातून आपण स्वतः या आंदोलनाचे नेतृत्त्व करीत युवाशक्ती संघटीत केली होती. नरेश सावळ, जीत आरोलकर या पक्षाच्या इतर नेत्यांनीही परिश्रम घेतले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत गोमंतकीय जनतेने भाजपावर विश्वास दाखवित स्पष्ट कौल दिला. त्यामुळे भाजपा सरकारवर साहजिकच दबाव व जबाबदारी वाढली आहे. सध्या राज्यात व केंद्रातही भाजपाचे सरकार आहे. केंद्र सरकारपुढे गोव्याची बाजू पटवून देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर नेत्यांचे जोरदार प्रयत्न चालले आहेत. मात्र सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचा संघटीत आवाज दिल्लीपर्यंत पोचला पाहिजे. तेव्हाच गोव्याच्या न्याय्य मागणीकडे देशाचे लक्ष वेधले जाईल. मुख्य़मंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हादईसाठी केलेल्या आवाहनाला गोव्यातून भक्कम पाठबळ व प्रतिसाद देण्याचे आवाहन डॉ. भाटीकर यांनी केले आहे.