आरक्षणामुळे राजकारणात आता महिलांना अधिक संधी
पणजी : भाजपच्या तिन्ही महिला आमदार मंत्रिपदासाठी सक्षम आहेत, पण एकाच कुटुंबातील दोन सदस्यांना मंत्रीपद देणे शक्य नाही, असे स्पष्ट मत भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केले आणि केंद्र सरकारने संमत केलेल्या महिला आरक्षण विधेयकाचे स्वागत करत असल्याचे सांगितले. बुधवारी पणजीत भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी डॉ. देविया राणे, जेनिफर मोन्सेरात, डिलायल लोबो या तिन्ही महिला आमदारांसह सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांचीही उपस्थिती होती. महिला आरक्षण विधेयकास अनुसरून बोलताना, वर्ष 2027 पूर्वी जनगणना आणि मतदारसंघ फेररचनेचे कार्य पूर्ण झाल्यास गोवा विधानसभा निवडणुकीत महिलांसाठी 33 टक्के आरक्षण देणे शक्य होणार आहे. तसे झाल्यास आरक्षण देणारे गोवा हे पहिले राज्य ठरेल. त्यावेळी विधानसभेत 13 महिला असतील व त्यामधील अनेकांना मंत्रीपदेही प्राप्त होतील, असे तानावडे यांनी सांगितले. काँग्रेसला जे कधीच जमले नाही ते भाजपने करून दाखविले आहे. हे विधेयक प्रथम मांडल्याचा काँग्रेसचा दावा निरर्थक आहे. कारण, त्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेणारा पक्ष सत्तास्थानी असणे आवश्यक आहे. भाजपने ते कऊन दाखविले आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने महिलांच्या स्वावलंबन तथा सक्षमीकरणासाठी विविध योजना लागू केल्या असून त्यांना प्रतिसादही उत्स्फूर्त लाभला आहे. आयुष्मान भारत, उज्ज्वला यासारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून महिलांना साहाय्य केले. तसेच स्वच्छता अभियानंतर्गत 12 कोटी घरांमध्ये स्वच्छतागृहे उभारून नैसर्गिक विधींसाठी उघड्यावर जाण्याच्या समस्येपासून मुक्ती दिली. जलजीवन मिशनंतर्गत देशभरात 10.50 कोटी घरांमध्ये पाण्याची जोडणी दिली, असे तानावडे यांनी सांगितले. आता आम्ही राजकारणातही महिलांना सक्षम करणार आहोत. सध्या राज्य विधानसभेत तीन महिला आमदार आहेत. कोणतेही मंत्रीपद सांभाळण्यास व स्वत:चे निर्णय घेण्यास त्याही सक्षम आहेत. जेनिफर यांनी तर गत सरकारात महसूल मंत्रीपद सांभाळलेले आहे. परंतु सध्या त्यांचे पतीही आमदार वा मंत्री असल्यामुळे एकाच कुटुंबात दोन सदस्यांना मंत्रीपदे देण्यात येऊ शकत नाही. असे असले तरीही चिंता करण्याची गरज नाही, योग्य वेळी सर्व काही योग्यच होणार आहे, असे सांगून तानावडे यांनी तिन्ही महिला आमदारांचे कौतुक केले.
15 लाखांपेक्षा जास्तच दिले आहेत
दरम्यान, यापूर्वी पंतप्रधानांनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख ऊपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते, ते अद्याप पूर्ण झालेले नसताना आता ’महिला आरक्षणाच्या’ नावाखाली नव्याने दाखविलेले ’गाजर’ आहे. या आरक्षणाबाबतही तोच प्रकार होणार आहे, अशी टीका विरोधक करत असल्याचे पत्रकारांनी तानावडे यांच्या लक्षात आणून दिले असता, आतापर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून 15 लाखांपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात पैसे जनतेपर्यंत पोहोचले आहेत, असा दावा त्यांनी केला.
सध्या मी शिकत आहे : डॉ. देविया राणे
‘मी प्रथमच आमदार बनले आहे. सध्या मी शिकत आहे. आम्ही पुढील स्तरावर जाऊ शकत नाही. हळूहळू प्रगती करायची आहे. विद्यमान मंत्र्यांना पूर्वीचा बराच अनुभव आहे. विधानसभेचे प्रत्येक अधिवेशन हे शिकण्याचे सत्र असते. मी वरिष्ठांकडून शिकत आहे. पुढची वेळ नेहमीच असते, असे आमदार देविया राणे यांनी संबंधित एका प्रश्नावर सांगितले.