डिजिटल अर्थव्यवस्थेला मिळणार चालना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने भारतात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 1.40 लाख कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. कंपनीच्या दिल्लीत झालेल्या संभव परिषदेत ही घोषणा करण्यात आली.
कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष (भारत आणि उदयोन्मुख बाजार) अमित अग्रवाल म्हणाले की, अॅमेझॉनने भारतासोबतचे व्यावसायिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी नवीन करार केले आहेत. भारताची डिजिटल अर्थव्यवस्था आणि निर्यातीला चालना देण्यासाठी अनेक उपक्रमांवर काम केले जात आहे. कंपनीने 2030 पर्यंत भारतात 1.40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे वचन दिले आहे.
अॅमेझॉनची नवी दिल्लीत संभव परिषद आयोजीत केली होती. दरवर्षी ही परिषद आयोजित केली जाते. भारताची डिजिटल वाढ वाढवण्याबाबत उद्योगातील प्रमुख नेते आणि धोरणकर्त्यांशी चर्चा केली आहे. भारतीय बाजारपेठ विक्रेत्यांना आगामी काळात लाखो ग्राहकांपर्यंत वाढण्याची संधी देईल.
कंपनीने अनेक करार केले
अॅमेझॉनने लहान आणि मध्यम उद्योगांना निर्यातीसाठी क्रॉस-बॉर्डर लॉजिस्टिक प्रदान करण्यासाठी इंडिया पोस्टसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. त्याच वेळी, अॅमेझॉन ही देशातील पहिली ई-कॉमर्स कंपनी आहे जिने भारतीय रेल्वेच्या समर्पित फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी करार केला.