एसडीएमसी अध्यक्ष-सदस्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : सरकारने 200 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये क्रीडाशिक्षक भरती करू नये, असा आदेश बजावला आहे. सरकारच्या या आदेशामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. होतकरू व क्रीडा विभागात गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाअभावी मागे रहावे लागत असल्याने सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी तालुक्यातील एसडीएमसी अध्यक्ष व सदस्यांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. मागील काही वर्षात राज्य सरकारने क्रीडाशिक्षक भरतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. क्षमता असूनही अनेक क्रीडाशिक्षक वंचित आहेत. राज्य सरकारने काढलेल्या नव्या आदेशामुळे क्रीडा शिक्षकांवर अन्याय होत आहे. केवळ क्रीडा शिक्षकच नाही तर विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा फटका बसत आहे. तालुक्यातील अनेक शाळांची पटसंख्या 200 हून अधिक असतानाही क्रीडाशिक्षक देण्याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. राज्य सरकारने क्रीडा शिक्षकविषयीच्या आदेशामध्ये बदल करण्याची मागणी एसडीएमसी सदस्यांनी केली. त्यावेळी किसन सुंठकर, मनोहर हुंदरे, गंगाधर गुरव, देवाप्पा पाटील, नामदेव कोळेकर यासह इतर उपस्थित होते.