रशियाला मदत केल्यास परिणाम भोगावे लागणार ः चीनकडून बलूनवरील कारवाईचा मुद्दा उपस्थित
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन आणि चीनचे मुत्सद्दी वांग यी यांची भेट झाली आहे. या भेटीदरम्यान ब्लिंकेन यांनी रशियाला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्याप्रकरणी चीनला कठोर इशारा दिला आहे. चीनने रशियाला मदत केल्यास त्याला परिणाम भोगावे लागतील. तसेच यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध बिघडू शकतात असे ब्लिंकेन यांनी सुनावले आहे. चीन आणि अमेरिकेतील वाढत्या तणावादरम्यान म्युनिच सुरक्षा संमेलनावेळी ब्लिंकेन आणि वांग यी यांची भेट झाली आहे.
दुसरीकडे स्पाय बलूनवरील बिडेन प्रशासनाची कारवाई चुकीची होती असा दावा चिनी मुत्सद्दी वांग यी यांनी केला आहे. आकाशात अनेक देशांचे कित्येक बलून असतात. सर्व बलून्सला अमेरिका स्वतःच्या लढाऊ विमानांद्वारे नष्ट करणार का? अमेरिकेने स्वतःच्या देशांतर्गत समस्यांपासून जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी अशा निरर्थक गोष्टी करू नयेत असे वांग यी यांनी म्हटले आहे.
चीनने करू नये आगळीक
अमेरिकेचे विदेशमंत्री ब्लिंकेन यांनी चीनला स्पाय बलून पाठविण्यासारखे बेजबाबदार कृत्य पुन्हा न करण्याचा इशारा देखील आहे. अमेरिका अशाप्रकारचे कृत्य सहन करणार नाही तसेच चीनने या कृत्याची पुनरावृत्ती करू नये असे ब्लिंकेन यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.
चीनच्या हेरगिरी कार्यक्रमाचा भांडाफोड
तर बैठकीनंतर अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाकडून एक संदेश प्रसारित करण्यात आला. चीनकडून कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप किंवा उल्लंघन अमेरिका सहन करणार नाही. चीनने स्वतःच्या हेरगिरी कार्यक्रमाद्वारे जवळपास 40 देशांच्या हवाईक्षेत्राचे उल्लंघन केल्याचे आता समोर आले असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
संबंध सुधारण्याची चीनला अपेक्षा
अमेरिका चीनसंबंधी भ्रमात आहे. अमेरिकेची कृती द्विपक्षीय संबंधांना हानी पोहोचविणारी आहे. अमेरिका सर्वप्रकारे चीनला कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहे, तसेच तो अन्य देशांना यात सामील करत आहे. अमेरिका स्वतःचे वर्तन बदलून चीनसंबंधी सकारात्मक भूमिका घेईल अशी अपेक्षा घेईल आणि दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याचा प्रयत्न करेल अशी अपेक्षा असल्याचे वांग यी म्हणाले.
बलून वादानंतर वाढला तणाव
3 फेब्रुवारी रोजी अमेरिकेत चीनचा स्पाय बलून दिसून आला होता. तर 5 फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्या आदेशानुसार बलून नष्ट करण्यात आला होता, तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. बलून दिसून आल्यावर ब्लिंकेन यांनी स्वतःचा चीन दौरा देखील रद्द केला होता. तर दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्धामुळे देखील पाश्चिमात्य देशांची चीनवर करडी नजर आहे.