ऑनलाईन टीम / तरुण भारत :
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत झाली आहे. एका ॲक्शन सीक्वेन्समध्ये बच्चन जखमी झाले असून, त्यांच्या उजव्या बरगडीचे स्नायू फाटले आहेत.
‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटासाठी बच्चन मागील काही दिवसांपासून हैदराबादच्या रामोजी फिल्मसिटीत शूटिंग करत आहेत. शनिवारी दुपारी या चित्रपटाच्या एका शॉटवेळी बच्चन यांच्या बरगडीला दुखापत झाली. त्यानंतर प्राथमिक उपचार करून त्यांना एअर ॲम्बुलन्सने मुंबईला हलवण्यात आले. मुंबईत उपचार घेतल्यानंतर सध्या बच्चन यांची प्रकृती स्थिर असून, ते ‘जलसा’ या निवासस्थानी आराम करत आहेत. दुखापत बरी होण्यासाठी काही आठवडे जाणार आहेत, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर प्रकृतीसंदर्भात अपडेट दिले आहेत. “बरगडय़ांना इजा झाल्यामुळे श्वास घेताना आणि हालचाल करताना वेदना होत आहेत. या वेदना कमी करण्यासाठी औषधे घेत आहे. मी काही दिवस मोबाईलवर उपलब्ध असेन, परंतु संपूर्णतः बेड रेस्टवर आहे. त्यामुळे शूटिंग सध्या रद्द करावे लागत आहे.” दरम्यान, बच्चन यांचा ब्लॉग वाचल्यानंतर अनेकांनी त्यांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.