करारावर चर्चा सुरू, आरक्षणासंबंधी 21 नोव्हेंबरला सर्वोच्च सुनावणी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिका आणि भारतादरम्यान मागील काही वर्षांमध्ये व्यापारासोबत संरक्षण संबंधही वेगाने मजबूत होत आहेत. दोन्ही देशांनी स्वतंत्र हिंद-प्रशांत आणि चीनच्या आव्हानादरम्यान विविध क्षेत्रांमध्ये सहकार्यात वाढ करण्याचे सत्र आरंभिले आहे. अशा स्थितीत पुढील काळात भारत आणि अमेरिका लवकरच सैन्य प्रणालींच्या निर्मितीतही सहकार्य करू शकतात असा दावा अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे.
पेंटागॉनमधील दक्षिण आशिया धोरणाचे संचालक सिद्धार्थ अय्यर यांनी हडसन इन्स्टीट्यूटमध्ये बोलताना हा दावा केला आहे. भारत आणि अमेरिका सैन्य प्रणालींच्या निर्मिती एकत्र आल्यास भारताच्या संरक्षण उद्योगाला उच्च तंत्रज्ञानयुक्त शस्त्रास्त्रांच्या निर्मितीची संधी मिळू शकते. याचबरोबर भारतात अमेरिकेच्या शस्त्रास्त्रांच्या निर्मितीचा मार्ग मोकळा होऊ शकतो असे अय्यर यांनी म्हटले आहे.
अमेरिका सध्या भारत सरकारसोबत युद्धात वापरल्या जाणाऱ्या जमीन आधारित पारंपरिक शस्त्रास्त्रांच्या निर्मितीकरता चर्चा करत आहे. याचबरोबर दोन्ही देशांमध्ये गुप्तचर तंत्र तसेच देखरेखीत वापरल्या जाणाऱ्या सैन्यप्रणालींच्या निर्मितीवरूनही चर्चा सुरू आहे. अमेरिकेकडून परस्पर संरक्षण खरेदी करार निश्चित करण्यासाठी वाटाघाटी केल्या जात आहेत. यावर अधिक माहिती प्रक्रिया पुढे सरकल्यावरच देता येणार असल्याचे अय्यर यांनी सांगितले आहे.
भारतीय-अमेरिकन नागरिक असलेले अय्यर यांनी पुरवठा व्यवस्थेच्या सुरक्षेला अंतिम स्वरुप देण्यासाठी दोन्ही देशांमधील चर्चेत चांगली प्रगती होत असल्याचे नमूद केले आहे. आम्ही परस्पर संरक्षण खरेदी करार करण्यासाठी वेगाने पावले टाकत आहोत. अमेरिका-भारत संबंध योग्य दिशेने पुढे जाणे आवश्यक असण्यासोबत हिंद-प्रशांत क्षेत्रात आमच्या रणनीतिला मूर्त रुप देण्यासाठी अनिवार्य देखील असल्याचे अय्यर म्हणाले.