स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थ्यांचा गौरव
प्रतिनिधी/ बेळगाव
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त एसकेई सोसायटीची महाविद्यालये व शाळांचे सुमारे 3 हजार शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत लक्षवेधी असा सांस्कृतिक कार्यक्रम झाला.
ध्वजारोहण व राष्ट्रगीतानंतर सिनीअर अंडर ऑफिसर राहुल हुलमनी यांच्या नेतृत्वाखाली एनसीसी, एनएसएससह 13 गटांनी शानदार पथसंचलन केले. त्यानंतर डॉ. शोभा नाईक, निवृत्त शिक्षिका विजयालक्ष्मी नायक, कर्मचारी एस. वाय. बनवे यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर विविध क्षेत्रात प्रावीण्य, पुरस्कार मिळविलेले डॉ. अक्षय कुलकर्णी, डॉ. पी. टी. हणमगोंड, प्रा. आर. टी. कटांबले, डॉ. एम. एस. कुरणी, प्रा. पी. पी. पाटील, डॉ. ऋतुजा कोलते, प्रा. प्रियंका कुंडेकर, प्रा. तस्नीम ताज यांचाही सत्कार करण्यात आला.
भारत सरकारचा सायन्स इन्स्पायर अवॉर्ड 2021-22 मिळविणारी स्वाध्याय विद्या मंदिर हायस्कूलची विद्यार्थिनी रितू बावन्नवर तसेच विविध क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळविणारे जीएसएस महाविद्यालयाचे विद्यार्थी अमोल कांबळे, अरुण माळवी, ऐश्वर्या नेसरकर, शुभांगी काकतकर, सतीश हेगडे यांचाही सत्कार करण्यात आला.
यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गीते सादर केली. वसंत बापट यांचे ‘उधळीत शतकिरणा’ तसेच भारत मातेय शिखवू उळिसलु आणि ‘चिलिपीली हक्कीगलु नीवू’ ही कन्नड देशभक्ती गीते, बहारदार लोकनृत्ये व नाटिका सादर केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पवनकुमार यांनी केले तर वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.