न्हावेली / वार्ताहर
रोजच्याप्रमाणे पहाटे पाणी भरण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना मळगाव कुंभारआळी येथे आज घडली. नागेश महादेव राऊळ ( ६३ ) असे त्यांचे नाव असून याबाबतची खबर त्यांच्या नातेवाईक प्रमोद गावडे रा. कोनापाल यांनी सावंतवाडी पोलिसात दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला. पंचनाम्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, नागेश महादेव राऊळ हे पहाटे घरालगत असलेल्या सार्वजनिक विहिरीत पाणी आणण्यासाठी जात असत. नेहमीप्रमाणे आज देखील ते पहाटे विहिरीकडे गेले मात्र बराचवेळ झाला तरी ते घरी न परतल्याने घरच्यांनी शोधाशोध केली . यावेळी विहिरीच्या बाजूला कळशी व दोरी दिसून आल्याने स्थानिकांनी विहिरीत शोध घेतला असता त्यांचा मृतदेह निदर्शनास आला.स्थानिकांनी याबाबतची खबर त्यांचे नातेवाईक तथा सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे यांनी याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांना दिली.मृत नागेश यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,दोन मुली,सून,भावजय पुतणे,नातवंडे असा परिवार आहे.