बेळगाव : साताऱ्यातील कास पठारावरील रानफुलांचे सौंदर्य तेथे जाऊन पाहणे प्रत्येकालाच शक्य नसते. परंतु, तेथील दुर्मीळ फुलांचे छायाचित्र प्रदर्शन बेळगावमध्ये भरविण्यात आले आहे. बेळगावमधील टॅक्स प्रॅक्टिशनर्स विजय भागवत व नरसिंह जोशी यांनी काढलेल्या फोटोंचे प्रदर्शन सध्या टिळकवाडी येथील वरेरकर नाट्यासंघाच्या के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे. शुक्रवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. सोनाली सरनोबत व व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या, सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये विरंगुळ्यासाठी एखादा तरी छंद जोपासणे गरजेचे आहे. आकडेमोडीशी निगडीत असलेल्या जोशी व भागवत यांनी कास पठारावरील अप्रतिम सौंदर्य आपल्या कॅमेऱ्यातून टिपले आहे. यातील काही फुले वर्षातील काहीच दिवस पहायला मिळतात. त्यामुळे या प्रदर्शनाचा बेळगावकरांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रदर्शनामध्ये मांडली 35 छायाचित्रे
विजय भागवत यांनी स्वागत करत देहदानाविषयी माहिती दिली. त्याचबरोबर या प्रदर्शनामध्ये 35 छायाचित्रे मांडण्यात आल्याचे सांगितले. यातील मराठीत ओळखले जाणारे उलटी टोपलीचे फूल नऊ वर्षातून एकदाच पहायला मिळते. या फुलाचा आपण फोटो कसा काढला, याची माहिती त्यांनी दिली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. आतापर्यंत देहदानाचा संकल्प केलेल्या व्यक्तींचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला.
प्रदर्शन सोमवारपर्यंत राहणार खुले
कास पठारावरील रानफुलांचे सौंदर्य दर्शविणारे फोटो प्रदर्शन बेळगावमध्ये प्रथमच भरविण्यात आले आहे. निसर्गप्रेमींसाठी ही एक पर्वणी असून सोमवार दि. 20 नोव्हेंबरपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. बेळगावमधील निसर्गप्रेमींनी या प्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.