केएससीए 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए 19 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात आनंद क्रिकेट अकादमी संघाने तानाजी स्पोर्ट्स क्लब हुबळी संघाचा 199 धावांनी तर क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटका धारवाड संघाने इंडियन बॉईज संघाचा 155 धावांनी पराभव करुन प्रत्येकी 4 गुण मिळविले. शतकवीर तनुश धुमाले व यशस कुरबर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
ऑटोनगर येथील केएससीए मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात आनंद क्रिकेट अकादमी संघाने प्रथम फलंदाजी करताना 48.4 षटकात सर्व गडी बाद 284 धावा केल्या. त्यात तनुश धुमालेने 1 षटकार, 12 चौकारांसह 108 धावा करुन आपले पहिले शतक झळकाविले. त्याला साईराज देसाईने 6 चौकारांसह 44, लाभ वेर्णेकरने 3 चौकारांसह 32, रिहान अलीने 4 चौकारांसह 23 व सिद्धांत करडीने 18 धावा केल्या. तानाजी स्पोर्ट्स क्लब हुबळीतर्फे सात्विक काळेने 32 धावात 3, रक्षित कित्तुरने 56 धावात 3 तर प्रकाश मादार, राहुल पोवार, प्रतिक हेब्बळी, प्रेम डी. यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना तानाजी स्पोर्ट्स क्लब संघाचा डावा 26.4 षटकात 85 धावात आटोपला. त्यात अभिषेक बालाजी 3 चौकारांसह 17 तर खाजा बिजापूरने 11 धावा केल्या. आनंदतर्फे सचिन लोहारने 5 धावात 3, आदित्य पाटीलने 14 धावात 3, रोहित कल्लूरने 32 धावात 2 तर साईराज देसाई, जगदिश कलण्णावर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटका धारवाड संघाने प्रथम फलंदाजी करताना 39.5 षटकात 213 धावा केल्या. त्यात यशस कुरबरने 10 चौकारांसह 82, शिवनगौडा पाटीलने 9 चौकारांसह 74 धावा केल्या. इंडियन बॉईजतर्फे मुईझ दलायत 72 धावात 3, आर्सलेन 67 धावात 2 तर आशिष, जिशान व मलिक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंडियन बॉईज संघाचा डाव 24.1 षटकात 58 धावात आटोपला. त्यात मयांक पाटीलने 10 धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. सीसीके धारवाडतर्फे अभय कुलकर्णीने 22 धावात 5, लक्ष्मण आर्यनभटने 13 धावात 3, यशस कुरबरने 13 धावात 2 तर संकेत नायरने 1 गडी बाद केला.