हलगा येथील घटना : चक्क घरात आला साप : केवळ दैव बलवत्तर म्हणून टळली दुर्घटना : भरदुपारच्या घटनेने खळबळ
वार्ताहर /किणये
साप दिसला की प्रत्येकजण सळो की पळो करतो. अनेकांच्या उरात धडकीच भरते. साप हा टीव्ही, मोबाईलमध्ये पहायला आवडतो. प्रत्यक्षात मात्र साप समोर आला की भल्याभल्यांना घाम फुटतो. मात्र हलगा गावात एका मुलीच्या पायाला सापाचा स्पर्श झाला. सापाने फणाही काढला होता. मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून ती सापाच्या तावडीतून बचावली आहे. सदर घटना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. बस्तवाड हलगा गावातील अर्था पाटील ही मुलगी आपली काकू विद्या पाटील यांच्या हलगा या गावी शाळेला सुटी पडली होती म्हणून आली होती. हलगा गावातील बाजूलाच असणाऱ्या सुहास सैबनवर यांची मुलगी पन्ना सैबनवर तिच्याबरोबर खेळण्यासाठी म्हणून अर्था पाटील सुहास यांच्या घरी मंगळवारी दुपारी आली होती. अर्था येत असतानाच तिच्या केवळ एक दोन मिनिट आधी घरच्या पायरीजवळ नागसाप आला होता. अर्थाने त्या सापाकडे पाहिलेही नव्हते. साप पायरीजवळील भिंतीच्या बाजूला होता. तिने पन्ना हिला खेळण्यासाठी आवाज दिला.
याचवेळी खाली असलेला नागसाप अर्थाच्या पायात आला. त्या सापाने फणा काढला. मात्र या सापाच्या तावडीतून सुदैवाने अर्था बचावली. लागलीच ती घरात पळून गेली. अर्था तिचे काका अक्षय कुमार पाटील यांच्याकडे राहते. काकूच्या घरी हलगा गावाला ती आली होती. मंगळवारचा सापाचा हा प्रसंग सर्वांसाठीच धक्कादायक असा होता. एवढ्या लहान मुलीने अगदी धाडसाने सापाच्या तावडीतून आपला बचाव करून घेतला. सुहास सैबनवर यांच्या घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सदर साप आलेला व त्याने कशाप्रकारे त्या मुलीवरती फणा उचलला हा प्रसंग कैद झाला आहे. या प्रसंगाचा व्हिडिओ मंगळवारी दिवसभर सर्वत्र व्हायरल झाला होता. बस्तवाड गावातील सर्पमित्र रामा पाटील यांना बोलावून घेण्यात आले. सुमारे अर्धा तास सुहास सैबनवर यांच्या घरात सदर साप ठाण मांडून होता. रामा पाटील यांनी त्या सापाला पकडून अन्य ठिकाणी सोडून दिले. अनेक नागरिकांनी अर्था पाटील हिला भेटून तिची दिवसभर चौकशी व विचारपूस करीत होते.
मुलगी सुखरूप बचावली यातच आनंद
अर्था पाटील ही मुलगी आमच्या गावात पाहुणी म्हणून आली होती. ती माझी मुलगी पन्ना तिच्याबरोबर रोज खेळण्यासाठी येत होती. नेहमीप्रमाणे आजही ती दुपारी आली. मात्र ती आमच्या घरच्या चौकटीत असताना मुलगी ओरडली. याचवेळी मी बाहेर आलो, पाहतो तर तिच्या पायाजवळ साप होता. तिला मी लागलीच ओरडलो. आणि बाजूला सरक म्हणून सांगितलं. त्यानंतर ती बाजूला सरकली आणि आमच्या घरात आली. ती सापापासून सुखरूप बचावली याचा आम्हाला आनंद होत आहे.
– सुहास सैबनवर-हलगा