सफाई कर्मचाऱ्यांना चांगलेच सुनावले : वेळेत कचरा उचल करण्याची सूचना
बेळगाव : कचऱ्याची उचल वेळेत केली जात नाही. कचरा उचल करण्यासाठी कंत्राटदार कमी कामगार घेत असतात. त्यामुळे अनेक कामगारांवर कामाचा ताण पडतो. जनतेच्या कचऱ्याबाबत तक्रारी वाढल्या आहेत. त्याची दखल महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी घेऊन पहाटेच सायकलवरून अनगोळसह इतर परिसरात फेरफटका मारला. यावेळी त्यांनी जवळून पाहणी केली आणि कामचुकार कर्मचाऱ्यांना चांगलाच हिसका दाखविला. कामे वेळेत करा, काम करताना कंत्राटदारानेही योग्यप्रकारे कामगार ठेवावेत, अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. काही ठिकाणी असलेले कचऱ्याचे ढीग तसेच ठेवून इतर भागातील कचऱ्याची उचल कर्मचाऱ्यांनी केल्याचे दिसून आले. त्यामुळे अशोक दुडगुंटी हे चांगलेच संतप्त झाले होते. कचऱ्यासाठी महानगरपालिका कोट्यावधी रुपये खर्च करत असते. तरी देखील शहरामध्ये कचरा तसाच पडून आहे. हे योग्य नाही, असे कर्मचाऱ्यांबरोबरच मनपाच्या निरीक्षकांनाही त्यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या कौन्सिलिंग मिटींगबरोबरच स्थायी समितीच्या बैठकांमध्ये कचऱ्याबाबत जोरदार चर्चा झाली होती. अनेक ठिकाणी कचरा तसाच पडून राहतो. त्यामुळे दुर्गंधी पसरलेली असते. याबाबत जनतेतून तक्रारी वाढल्या आहेत. त्याची दखल मनपा आयुक्तांनी घेतली. सोमवारी पहाटे सायकलवरून फेरी मारली. त्यानंतर कचरा वाहतूक करणाऱ्या रिक्षात बसून त्यांनी अनेक ठिकाणी भेट दिली. सफाई कर्मचाऱ्यांना कचऱ्याची उचल वेळेत करण्याबरोबरच स्वत:च्या आरोग्याची काळजीही घेण्याची सूचना केली आहे. कचरा उचल करताना हातामध्ये ग्लोज तसेच पायामध्ये बूट परिधान करा, असे त्यांनी सांगितले. काही जणांनी हातामध्ये ग्लोज घातले नव्हते. त्यामुळे त्यांनी त्या कर्मचाऱ्यांना चांगलेच सुनावले. कचऱ्याची उचल वेळेत करा, काही ठिकाणी रस्त्यावर टाकण्यात आलेल्या कचऱ्याची पाहणी करून त्याठिकाणी नागरिकांनाही कचरा फेकू नका, अशी सूचना द्या, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.