भूगर्भ संशोधन संस्थेचा महत्वपूर्ण निष्कर्ष, अत्याधुनिक उपकरणांमध्ये उपयोग
हैद्राबाद / वृत्तसंस्था
आंध्र प्रदेशात दुर्मिळ मौलांचा मोठा साठा सापडला आहे. ही 15 प्रकारांची मूलद्रव्ये असून ती इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी, वाहने, कृत्रिम बुद्धीमत्ता साधने आदी अनेक उपकरणांच्या निर्मितीमध्ये महत्वाची असतात. नुकताच जम्मू-काश्मीरमध्ये लिथियम नामक मूलद्रव्याचा अब्जावधी रुपये किमतीचा साठा आढळून आला होता. त्यानंतर आता आंध्र प्रदेश हे राज्यही अशा मूलद्रव्यांचा स्रोत असल्याचे दिसून आले आहे. भूगर्भ संशोधन संस्थेने हा निष्कर्ष काढला आहे.
आंध्र प्रदेशात जी मूलद्रव्ये किंवा मौले सापडली आहेत, ती अत्यंत दुर्मिळ अशी आहेत. ऍलानाईट, सेरियाईट, थोराईट, कोलंबाईट, टँटालाईट, ऍपेटाईट, झिरकॉन, मोनेझाईट, पाययोक्लोअर एक्झेनाईट आणि फ्लोराईट ही या 15 मूल्यद्रव्यांपैकी काही मूलद्रव्ये आहेत. या मूलद्रव्यांची खनिजे आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्हय़ायच विविध भागांमध्ये आढळून आली आहेत. भूगर्भ संशोधन संस्थेच्या नव्या अहवालात त्यांची माहिती देण्यात आली आहे. जे साठे सापडले आहेत, त्यांच्यामुळे भारताच्या साधनसंपत्तीत मोठी भर पडेल असे दिसून येत आहे.
करावी लागते आयात
भारतात केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक उत्पादने, वाहनांच्या बॅटरीज आणि सेमीकंडक्टर्स यांच्या निर्मितीला मोठे प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्या निर्णयाला बळ देणारे हे संशोधन आहे. भारताला सध्या ही मूलद्रव्ये आयात करावी लागतात. त्यामुळे भारत या संदर्भात परावलंबी आहे. मात्र, आता भारतात अशी मूलद्रव्ये अधिक प्रमाणात सापडू लगल्याने भारताचे जगात महत्व वाढणार आहे.
चीनकडे मक्तेदारी
सध्या दुर्मिळ मूलद्रव्यांचा सर्वात मोठा निर्यातदार देश म्हणून चीनची प्रसिद्धी आहे. मूलद्रव्यांच्या एकंदर जागतिक उत्पादनांपैकी 50 टक्क्यांहून अधिक मूलद्रव्ये चीनकडून उत्पादित आणि निर्यात केली जातात. पण भारतही अशा द्रव्यांसंदर्भात समृद्ध असू शकतो, असे जागतिक संशोधकांचे मत आहे. या मताला पुष्टी देणारे संशोधन आता होताना दिसत आहे. आत्मनिर्भर भारत या धोरणाला सामर्थ्य देणारे हे संशोधन आहे, अशी प्रतिक्रिया औद्योगिक विश्वात व्यक्त होत आहे.
वैष्णोदेवी टेकडय़ा समृद्ध
वैष्णोदेवी या पवित्र स्थळाच्या परिसरातील पायथ्याकडच्या टेकडय़ांमध्ये लिथियम या मूलद्रव्याचे मोठे साठे सापडले आहेत. हा भाग रेयासी म्हणून ओळखला जातो. तो सलाल या खेडय़ात आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. येथे उत्तम दर्जाचे लिथियम खनीज सापडण्याची पुरेपूर संधी आहे, असे तज्ञांचे मत आहे.