वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
येथे सोमवारपासून सुरू होणाऱ्या 2023 च्या शेवटच्या अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेतून कॅनडाची महिला टेनिसपटू बियान्का अँड्रेस्क्यूला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागत असल्याची माहिती अमेरिकन टेनिस संघटनेने दिली आहे. त्याचप्रमाणे महिला विभागात पाओला बेडोसानेही दुखापतीमुळे या स्पर्धेत आपण खेळणार नसल्याचे स्पर्धा आयोजकांना कळवले आहे.
2019 साली अँड्रेस्क्यूने अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली होती. गेल्या काही दिवसापासून बिनाकाला सातत्याने पाठदुखापतीची समस्या जाणवत होती. दरम्यान तिच्या दुखापतीचे स्वरुप अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुखापतीवर ती सध्या वैद्यकीय इलाज करवून घेत असून तिला विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. अँड्रेस्क्यूचा सोमवारपासून सुरू होणाऱ्या अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील सलामीचा सामना सुरेंकोबरोबर खेळवला जाणार होता. 23 वर्षीय अँड्रेस्क्यू महिला टेनिसपटूंच्या सध्याच्या मानांकन यादीत 51 व्या स्थानावर आहे. चार वर्षापूर्वी म्हणज 2019 साली अँड्रेस्क्यूने अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचा पराभव करत अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. पाओला बेडोसाने या स्पर्धेतून माघार घेतल्याने आता व्हिनस विल्यम्सला पहिल्या फेरीतील सामन्यात दुसऱ्या प्रतिस्पर्धीची निवड करावी लागेल. व्हिनसला या स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला आहे.