वृत्तसंस्था/ लंडन
अँडी मरेने एका सेटची पिछाडी भरून काढत सर्बिटन येथे सुरू असलेल्या एटीपी चॅलेंजर 125 टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठताना ऑस्ट्रेलियाच्या जेसन कुबलरचा पराभव केला.
मरेने या लढतीत कुबलरवर 3-6, 6-3, 6-4 अशी मात केली. या वर्षात दुसरे चॅलेंजर जेतेपद पटकावण्याच्या मार्गावर असणाऱ्या मरेने बेसलाईन व वैविध्यपूर्ण फटक्यांचे मिश्रण करीत कुबलरवर विजय मिळविला. अन्य उपांत्यपूर्व लढतीत ऑस्ट्रियाच्या रोडिओनोव्हने गॅब्रियल डायलोचा 6-4, 6-4 असा पराभव केला तर झिझोयू बर्ग्सने सहाव्या मानांकित कॉन्स्टंट लेस्टीनेचा 7-6 (7-2), 6-3 असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली.