सेविकांसमोर अडचणी : अंडी वितरण वाटपात निधीचा अभाव
बेळगाव : मागील दोन महिन्यापासून अंगणवाडी सेविकांचे वेतन थांबले आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनात अडचणी येऊ लागल्या आहेत. एप्रिल आणि मे महिन्यांचे वेतन मिळाले नसल्याने सेविका वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात 50331 अंगणवाडी केंद्रे आहेत. या सर्व केंद्रातील सेविकांना वेतनापासून वंचित राहावे लागले आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले आहे. दरम्यान महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्रिपदी बेळगाव जिल्ह्यातील लक्ष्मी हेबाळकर यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे वेतन तातडीने मिळावे, अशी अपेक्षा सेविकांतून व्यक्त होऊ लागली आहे. त्याबरोबर इतर योजनादेखील बारगळल्या आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांसमोर अडचणी वाढू लागल्या आहेत. बालकातील कुपोषितपणा कमी व्हावा, यासाठी देण्यात येणारी अंडीदेखील ठप्प झाली आहेत. अंड्यांसाठी निधी उपलब्ध होत नसल्याने ही योजना रखडली आहे. त्यामुळे बालक, गर्भवती महिलांना अंड्यांपासून दूर राहावे लागले आहे.
अंडी वितरण लवकरच पूर्ववत होण्याची शक्यता
मागील चार महिन्यापासून अंडी खरेदीसाठी शासनाकडून अनुदान मिळाले नाही. परिणामी अंगणवाडी सेविकांना उधारीवर अंडी विकत घेण्याची वेळ आली आहे. इतकी बिकट परिस्थिती असली तरी महिला व बालकल्याण खाते व प्रशासन सुस्त असल्याचे दिसत आहे. गर्भवती व प्रसूत महिलांना सहा दिवस तर सामान्य मुलांना आठवड्यातून दोन दिवस अंडी दिली जातात. मात्र अनुदानाअभावी हे अंडी वितरण विस्कळीत झाले आहे. त्यामुळे बालक व महिलांना पौष्टिक आहारापासून वंचित राहावे लागत आहे. जिल्हा पंचायत सीईओ व महिला व बालकल्याण विभागाच्या उपसंचालकांनी अंडी पुरविण्याबाबत आदेश जारी केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात अंडी वितरण पूर्ववत होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीमुळे एप्रिलपासून अंडी खरेदीसाठी शासनाकडून अनुदान मिळाले नाही. त्यामुळे दोन महिने अंगणवाडीतील बालकांना अंड्यापासून दूर रहावे लागले आहे. त्याबरोबर गर्भवती व प्रसूती महिलानादेखील अंडी मिळत नसल्यामुळे बालकातील कुपोषितपणा वाढण्याची शक्यता आहे.
वेतन लवकरच मिळणार
अंगणवाडी सेविकांचे वेतन लवकरच मिळणार आहे. शिवाय अंड्यांच्या खरेदीसाठी देखील प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. लवकरच शासनाकडून निधी मंजूर होईल. निवडणुकीमुळे काही कामे प्रलंबित होती. ती आता मार्गी लागली आहे.
-बसवराजू (सहसंचालक महिला व बालकल्याण)