ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Anil Deshmukh’s bail stayed for 10 days शंभर कोटींच्या कथित खंडणी वसुली प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. मात्र, सीबीआय सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याने या जामिनाला न्यायालयाने 10 दिवसांची स्थगिती दिली आहे. त्यामुळे देशमुख यांना आणखी 10 दिवस तरुंगातच राहावे लागणार आहे.
या प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये देशमुख यांना याधीच जामीन मिळालेला आहे. मात्र, सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये मुंबई सत्र न्यायालयाने देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याबाबत सुनावणी पूर्ण झाली होती. दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान, आज मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाली.
अधिक वाचा : शाईफेक प्रकरणानंतर चंद्रकांत पाटलांच्या सुरक्षेत वाढ
एक लाखांच्या जातमुचलक्यावर देशमुखांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, सीबीआय सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याने न्यायालयाने या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती दिली आहे. आठवड्यातून दोन दिवस त्यांना ईडी कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे.