वृत्तसंस्था/ हांगझाऊ, चीन
आशियाई क्रीडा स्पर्धेतील टेनिसमध्ये भारताची अव्वल महिला टेनिसपटू अंकिता रैना व रुतुजा भोसले यांनी एकेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.
अंकिताने दुसऱ्या फेरीच्या सामन्यात एकही गेम न गमविता उझ्बेकच्या 17 वर्षीय सब्रिना ओलिमजोनोव्हाचा 6-0, 6-0 असा धुव्वा उडविला. अंकिताने मागील स्पर्धेत कांस्यपदक मिळविले असून तिला येथे तिसरे मानांकन मिळाले आहे. हाँगकाँगच्या आदित्या करुणारत्नेशी होईल. रुतुजला मात्र अरुझान सगनदिकोव्हावर विजय मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. दोन तासांच्या लढती तिने 7-6 (7-2), 6-2 असा विजय मिळविला. 13 व्या मानांकित रुतुजाची पुढील लढत अॅलेक्स इआलाशी होईल.
पुरुष एकेरीत रामकुमार रामनाथनला ताजिकिस्तानचा प्रतिस्पर्धी न आल्याने पुढे चाल मिळाली तर दुहेरीत रामकुमार व साकेत मायनेनी यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठताना इंडोनेशियाच्या अँथनी इग्नेशियस सुसांतो व डेव्हिड अॅगंग सुसांतो यांच्यावर 6-3, 6-2 अशी मात केली.
3×3 बास्केटबॉलमध्ये भारतीय पुरुष संघाने मलेशियाचा 20-16 असा पराभव केला तर महिलांमध्ये भारताला उझ्बेककडून 14-19 अशा बास्केट्सनी पराभव स्वीकारावा लागला. महिलांची पुढील लढत चीनशी तर पुरुषांची मकावविरुद्ध होईल. महिलांच्या हँडबॉलमध्ये भारताला जपानकडून 13-41 असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला. जपानची पुढील लढत नेपाळशी तर भारताची लढत हँगकाँगविरुद्ध होईल. भारताच्या गटात चीनचाही समावेश आहे.
मुष्टियुद्धमध्ये भारताच्या दीपकने मलेशियाच्या मुहम्मद अब्दुलवर 51 किलो वजन गटाच्या लढतीत 5-0 असा विजय मिळवित उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. महिलांमध्ये 60-66 किलो वजन गटाच्या लढतीत अरुंधती चौधरीला चीनच्या युंग लियुकडून 0-5 असा पराभव स्वीकारावा लागल्याने ती स्पर्धेबाहेर पडली.