कुंभारजुवेत नदीत बुडणाऱ्या तीन मित्रांचे वाचविले प्राण
प्रतिनिधी /रामानंद तारी
कुंभारजूवे येथील सरकारी प्राथमिक शाळेत इ. 4 थी च्या वर्गात शिकणाऱ्या व कुंभारजूवे येथे राहणाऱ्या अंकुरकुमार संजय प्रसाद या विद्यार्थ्याने असामान्य धाडस करून आपला जीव धोक्यात घालून विजयकुमार, आर्यन होसपेट व मुकेश या नदीत बुडणाऱ्या तीन मित्रांचे प्राण वाचवले. त्याच्या या धाडसाबद्दल कुंभारजूवे परिसरात त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. कुंभारजूवेवासीयांचे आराध्य दैवत श्री शांतादुर्गा कुंभारजूवेकरीण देवीची पालखी गुढीपाडव्यापासून घराघरात भेट देत असून गावात उल्हासाचे व चैतन्याचे वातावरण पसरले आहे. शनिवार दि. 25 मार्च रोजी दुपारी 3.30 वा देवीची पालखी सुरचेभाट येथे पोहोचली होती. सर्वजण देवीचं आपल्या घरात स्वागत करण्याच्या तयारीत मग्न होते. लहान मुले तसेच अन्य एकमेकांना गुलाल लावून पालखीचा आनंद लुटत होते. त्यातल्या विजयकुमार, आर्यन आणि मुकेश हे गुलाल उदाळत असताना एकाच्या डोळ्यात गुलाल गेला. तो गुलाल धुण्यासाठी ते तिघेही जवळच असलेल्या नदीजवळ गेले. तोंड धुवून पाय धूत असताना त्यांचा पाय घसऊन ते पाण्यात पडले व गटांगळ्या खाऊ लागले. त्यांना पोहता येत नव्हते. तेथूनच सायकल चालवत जाणाऱ्या त्यांचा मित्र अकुंरकुमार संजय प्रसाद याने त्यांना गटांगळ्या खाताना पाहून लोकांना सांगितले. परंतु कुणीही पुढे आला नाही तरी अंकुरकुमार गप्प बसला नाही. त्याने स्वत:च्या जीवाची तमा न बाळगता पाण्यात उडी घेऊन महतप्रयासाने तिघांनाही वर काढले. त्यांच्यावर स्वत:च प्रथमोपचार करून पाणीही बाहेर काढले. तोपर्यंत लोक तिथे जमा झाले. त्यातला विजयकुमार हा अस्वस्थ होता त्याला त्वरित बांबोळी येथे गोमेकॉत नेण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार चालू होते. आता त्याची प्रकृती ठिक आहे. विजयकुमार व मुकेश हे दोघेही शारदा विद्यालय सरकारी हायस्कूल कुंभारजूवे येथे 7 वीच्या वर्गात शिकत आहेत तर आर्यन हा अकुंरकुमार शिकत असलेल्या शाळेत इयत्ता तिसरीत शिकत आहे. कुंभारजुवे सरकारी प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या 10 वर्षांच्या अंकुरकुमार संजय प्रसाद यांच्या धाडसीपणामुळे त्या तीन मुलांचे प्राण वाचले. अंकुरकुमार हा बिहार येथील असून आपल्या आई-वडील व बहिणी समवेत कुंभारजूवे येथे राहत आहे. शिक्षण खात्याने या अंकुरकुमारच्या धाडसाची दखल घेऊन त्याला वीर पुरस्कार देवून गौरव करावा अशी मागणी कुंभारजुवे ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.