विशेष प्रतिनिधी /पणजी
राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद स्वीकाऊन स्थापन झालेल्या डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारची आज मंगळवारी वर्षपूर्ती असून यानिमित्त एक छोटेखानी कार्यक्रम वगळता अन्य कोणतेही कार्यक्रम सरकार पातळीवर आयोजित केलेले नाहीत. गतवर्षी 28 मार्च 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर झालेल्या मोठ्या इव्हेंट समारंभात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आरोग्यमंत्री विश्वजित राणे, नीलेश काब्राल, रवी नाईक, सुभाष शिरोडकर, नीळकंठ हळर्णकर, माविन गुदिन्हो, गोविंद गावडे, बाबुश मोन्सेरात आदींनी शपथ ग्रहण केली होती. त्यानंतर आठ दिवसांनी सुदिन ढवळीकर आणि सुभाष फळदेसाई या दोघांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात आली. वर्षभरात सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कित्येक वादग्रस्त निर्णयही घेतले व त्यातील काही निर्णय हे माघारी घ्यावे लागले. विकासकामांमध्ये गोवा अग्रेसर आहे. गोव्याच्या स्वयंपूर्ण योजनेचे संपूर्ण देशभरात हे मॉडेल म्हणून इतर सर्व राज्यांनी स्वीकारले, हेच गोव्याचे व डॉ. प्रमोद सावंत सरकारचे खरे यश आहे. म्हादईप्रकरणी केंद्राने जी भूमिका बजावली त्यातून या सरकारची गोची झालेली आहे. म्हादई हातातून गेली अशा पद्धतीचा सूर सर्वत्र उमटलेला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर आज डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार वर्षपूर्ती करीत आहे.