वार्ताहर /हरमल
मांदे येथील ’साहित्य संगम’ची वार्षिक नियोजन बैठक मंडळाच्या बत्तीसाव्या वर्धापनदिनी तीनशे चौऱयाऐशीव्या मासिक कार्यक्रमांतर्गत नुकतीच नवेवाडा मोरजी येथे मंडळाचे अध्यक्ष सुभाष शेटगांवकर यांच्या निवासस्थानी संपन्न झाली.
या कार्यक्रमात मंडळाच्या जून,2022 ते मे,2023 या कालावधीतील मासिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.
पुस्तकचर्चा,काव्यवाचन तथा गायन, जुन्या काळातील नामवंत साहित्यकांच्या समग्र साहित्यावर चर्चा,नामवंत लेखकाशी वार्तालाप, साहित्यकि सहल, आधुनिक तथा अभिजात नाटकावर चर्चा या कार्यक्रमांबरोबरच सुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या समग्र साहित्यावर आधारित विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले.
सर्व मासिक कार्यक्रमांची जबाबदारी विविध सदस्यांवर सोपविण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष सुभाष शेटगांवकर यानी स्वागत व प्रास्ताविक केले.कार्यवाह गजानन मांदेकर यानी ’साहित्य संगम’च्या बत्तीस वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. उभरती कलाकार विश्वेता विश्वनाथ शेटगांवकर हिचे मंडळाच्या बत्तीसाव्या वर्धापनदिनाप्रित्यर्थ रेखाटलेल्या रांगोळीबद्दल सर्व उपस्थित सदस्यांनी अभिनंदन केले. शंकर चोडणकर यानी शेवटी ऋणनिर्देश केला.
कार्यक्रमात शरद गावडे,दिलीप मेथर,मानसी शेटमांदेकर,गोपाळ सावंत,प्रभाकर गांवकर,भोलेश नाईक,विवेक वाटवे,श्रेया फडते,हरी शेटगांवकर,नारायण सावंत, निहारिका शेटगांवकर,उषा शेटगांवकर इत्यादींनी भाग घेतला.