रुपयाही घसरला, निफ्टी 17 हजाराच्या खाली
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सोमवारी, सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअरबाजारात मोठी पडझड पहावयास मिळाली आहे. मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक 1,000 हून अधिक अंकांनी घसरला असून निफ्टीही आता 17,000 च्या खाली पोहचला आहे. यामुळे शेअरबाजारातील कंपन्यांचे बाजारमूल्य साधारणतः 7 लाख कोटी रुपयांनी घसरले असून ते 2 कोटी 70 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचले आहे.
मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सोमवारी दिवसअखेर 953.70 अंकांनी घसरल्याचे वृत्त असून तो 57,145.22 अंकांवर बंद झाला. दिवसाच्या शेवटी त्यात काहीशी सुधारणा झाली. मात्र ती पडझडीच्या तुलनेने किरकोळच होती. मुंबई शेअरबाजाराच्या सर्वात महत्वाच्या 30 कंपन्यांपैकी सर्व कंपन्यांचे समभाग मंदीच्या झाकोळात सापडल्याचे दिसून येत आहे. तज्ञांनी याची कारणेही दिली आहेत.
जागतिक घसरण
शेअरबाजारांची ही घसरण केवळ भारतात नसून जागतिक पातळीवर आहे. युरोप, अमेरिका आणि चीनमध्येही आर्थिक मंदावलेपण दिसून येत आहे. अमेरिकेत सलग तिसऱया महिन्यात अर्थव्यवस्था संकोच पावली आहे. त्यामुळे अमेरिकेतील शेअरबाजारांमध्येही मोठय़ा प्रमाणात घसरण दिसून येत आहे. अमेरिकेतील डाऊ जोन्सची गेल्या शुक्रवारी 2.35 टक्के घसरण झाली होती, जी गेल्या अनेक वर्षांमधील एका दिवसातील सर्वात जास्त मानली जात आहे. आशिया खंडातील निक्की, तैवान आणि कोस्पी हे निर्देशांकही घसरले आहेत. शांघाय आणि हँगसेंगही सोमवारी उदासीनच राहिले. याचा भारतावरही परिणाम झाला.
व्याजदर वाढण्याची भीती
अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून पुन्हा व्याजदर वाढवेले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे झाल्यास त्याचा परिणाम भारतावर होणे अनिवार्य आहे. अमेरिकेतील व्याजदर वाढल्यास भारताचा परकीय चलन साठा घटण्याची शक्यता आहे. याचाही परिणाम शेअरबाजारांवर होत आहे, असे तज्ञांचे मत आहे.
बाँड परतावा वाढला
अमेरिकेत रोखे परतावा (बाँड यील्ड) मध्ये मोठी वाढ झाली. याचा परिणाम म्हणून भारतातही रोखे परतावा वाढविण्यात आला आहे. 2 वर्षांपूर्वी अमेरिकेतील रोखे परतावा 1.3 टक्के होता. तो आता 4.26 टक्क्यांवर पोहचला. त्यामुळे अमेरिकेतील रोख्यांमध्ये गुंतवणूक वाढणे आणि भारतात शेअरबाजार घसरणे शक्य आहे. 2010 पासूनही अमेरिकेतील ही सर्वात मोठी वाढ आहे.
रिझर्व्ह बँक व्याजदर वाढविणार ?
महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकही रेपो दर वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतात कर्जे महाग होऊन त्याचा परिणाम नव्या उद्योगांच्या स्थापनेवर होऊ शकतो, असे मत आहे. महागाई दरातील वाढ अनुमानापेक्षा जास्त असूनही रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत रेपो दरात वाढ करताना हात आखडता घेतला आहे. मात्र आता ही वाढ केली जाईल, अशी शक्यता आहे.
रुपयाचा पुन्हा नीचांक शेअरबाजाराप्रमाणेच भारतीय चलन असणारा रुपयाही घसरणीच्या विळख्यात सापडला आहे. सोमवारी दिवसअखेर त्याची डॉलरच्या तुलनेत 58 पैशांनी घसरण झाली. त्यामुळे तो डॉलरची किंमत आता 81. 67 रुपये इतकी झाली आहे. गेंल्या तीन दिवसात भारताचे चलन 1.10 रुपयाने घसरले आहे. या घसरणीची चिंताही शेअरबाजारात दिसून येत आहे. एकंदर, गुंतवणुकीच्या दृष्टीने सध्या वातावरण यथायथाच असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेअरबाजारांवर याचा विपरीत परिणाम होत असून ही स्थिती आणखी काही काळ अशीच राहण्याची शक्यता आहे. पण मुख्य परिणाम जागतिक उदासिनतेचा होत आहे, यावर तज्ञांचे एकमत आहे.