मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
वृत्तसंस्था/ चेन्नई
मद्रास उच्च न्यायालयाने अण्णाद्रमुकच्या कार्यकारिणीकडून 11 जुलै रोजी संमत प्रस्तावांच्या विरोधात पक्षनेते ओ. पन्नीरसेल्वम यांनी दाखल केलेली याचिका मंगळवारी फेटाळली आहे. अण्णाद्रमुकच्या कार्यकारिणीने ओ. पन्नीरसेल्वम आणि त्यांच्या समर्थकांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव संमत केला होता. न्यायालयाच्या निर्णयानंतर अण्णाद्रमुकने औपचारिक स्वरुपात ई. पलानिस्वामी यांची पक्ष महासचिव म्हणून घोषणा केली आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतर अण्णाद्रमुकच्या मुख्यालयाबाहेर पलानिस्वामी यांच्या समर्थकांन जल्लोष केला आहे. ओपीएस यांची याचिका फेटाळली गेल्यावर पलानिस्वामी यांनी पक्ष मुख्यालयात जात अण्णाद्रमुकचे दिवंगत नेते एम.जी. रामचंद्रन आणि जे. जयललिता यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
न्यायालयाने पक्षाच्या महासचिवाच्या निवडीविरोधात दाखल सर्व याचिका फेटाळल्या आहेत. पन्नीरसेल्वम आणि अन्य काही जणांनी 11 जुलै 2022 रोजीच्या प्रस्तावांच्या विरोधात याचिका दाखल केली होती अशी माहिती अण्णाद्रमुकचे वकील आय.एस. इन्बादुरई यांनी दिली आहे.
पक्षाच्या कार्यकारिणीकडून तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एडप्पादी पलानिस्वामी यांना अण्णाद्रमुकचे अंतरिम महासचिव म्हणून पदोन्नती देण्याच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकांवर मद्रास उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यात अंतरिम महासचिव म्हणून पलानिस्वामी यांची नियुक्ती कायम ठेवली होती, परंतु प्रस्तावांच्या वैधतेविषयी निर्णय मद्रास उच्च न्यायालय घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. पलानिस्वामी यांनी शनिवारी पक्ष महासचिव पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. तर पक्षाने योग्य प्रक्रियेचे पालन केले नसल्याचा आरोप पन्नीरसेल्वम यांनी केला होता.