1500 निदर्शकांनी रोखला देशातील सर्वात मोठा महामार्ग
वृत्तसंस्था/ हेग
नेदरलँडमध्ये पोलिसांनी 1500 हून अधिक निदर्शकांना अटक केली आहे. सरकारच्या हवामान विषयक धोरणांच्या विरोधात या निदर्शकानी हेग शहरातील महत्त्वाच्या महामार्गांवरील वाहतूक रोखली होती. निदर्शकांमध्ये देशातील अनेक सेलिब्रिटी देखील सामील आहेत.
निदर्शकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा केला. तरीही निदर्शक मागे न हटल्याने पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांकडून पाण्याचा मारा होण्याची शक्यता पाहता निदर्शक घरातूनच स्विम सूट परिधान करून अन् छत्री घेऊन आले होते.
‘एक्सटिंक्शन रेबेलियन’ नावाच्या या संघटनेकडून ही निदर्शने आयोजित करण्यात आली. अलिकडेच डच म्हणजेच नेदरलँडच्या सरकारने फोसिल फ्यूल सबसिडीची घोषणा केली आहे. याच्या विरोधात निदर्शक रस्त्यांवर उतरले ओत. सरकारच्या हवामान विरोधी धोरणांच्या विरोधात 7 हजारांहून अधिक लोक निदर्शने केल्याचा दावा संघटनेने केला आहे. युरोपीय महासंघानुसार यंदा युरोपमध्ये डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत सरासरी तापमानात 1994 च्या तुलनेत 1.4 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे.
एक्स्टिंक्शन रेबेलियन ग्रूपने 23 मे रोजी जिनिव्हा येथील प्रायव्हेट जेट्सच्या विक्रीशी निगडित एका कार्यक्रमातही निदर्शने केली होती. संघटनेच्या सदस्यांनी धावपट्टीवर निदर्शने केल्याने कार्यक्रमाचा बोजवारा उडाला होता. जगातील सुमारे 80 टक्के लोकसंख्येने कधीच विमानातून प्रवास केलेला नाही. जगातील 20 टक्के लोकच विमानाचा वापर करतात. हेच लोक सर्वाधिक ग्रीन गॅस उत्सर्जनासाठी जबाबदार आहेत असा आरोप संघटनेने केला आहे.