पूर्ण कॅनडासाठी लाजिरवाणी घटना : ट्रुडो
वृत्तसंस्था / ओटावा
कॅनडाच्या संसदेत नाझी सैनिक यारोसलाव्ह हुंका यांचा गौरव करण्यात आल्याप्रकरणी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी माफी मागितली आहे. ही केवळ संसदेसाठी नव्हे तर पूर्ण देशासाठी लाजिरवाणी घटना आहे. सभापतींनी स्वत:ची चूक मान्य करत माफी मागितली असल्याचे ट्रुडो यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे कॅनडातील विरोधी पक्ष सभापतींच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत.
संसदेत नाझी सैनिकाला कुणी आमंत्रित केले याच कल्पना नसल्याचे कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाने सांगितले होते. यासंबंधी करण्यात आलेल्या चौकशीत हुंकडा यांना सभापती एंथनी रोटा यांनी आमंत्रित केल्याचे स्पष्ट झाले होते.
कॅनडाच्या संसदेने नाझी सैनिकाला दोनवेळा स्टँडिंग ओवेशन दिले होते. यादरम्यान युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की हे संसदेत उपस्थित होते. झेलेंस्की हे ज्यूधर्मीय आहेत. रशियाविरोधात युद्ध झाल्यानंतर पहिल्यांदाच ते कॅनडाच्या दौऱ्यावर आले होते. याप्रकरणी सभापतींनी माफी मागणे पुरेसे नसल्याचे विरोधी पक्षांनी म्हटले आहे.
रशिया उचलणार लाभ
युक्रेन युद्धाच्या प्रारंभापासून रशिया आपण नाझींच्या विरोधात लढत असल्याचा दावा करत आहे. रशिया आता कॅनडातील घटनेचा लाभ उचलणार आहे. आम्हाला रशियाचा दुष्प्रचार रोखण्याची गरज असल्याचे ट्रुडो यांनी म्हटले आहे. तर कॅनडच्या कॉन्झर्वेटिव्ह पार्टीचे नेते पीयरे पोलिवर यांनी या घटनेप्रकरणी ट्रुडो हेच जबाबदार असल्याचा दावा केला आहे. सभापतींकडून आमंत्रित करण्यात आलेल्या लोकांची यादी पडताळून पाहणे हे पंतप्रधान कार्यालयाचे काम होते. कॅनडाचे लोक आता कुठल्याही गोष्टीची जबाबदारी न स्वीकारणाऱ्या पंतप्रधानाला कंटाळले आहेत. अशा पंतप्रधानांमुळे आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर चेष्टेचा विषय ठरलो आहोत. ट्रुडो हे स्वत:च्या चुकीचे खापर इतरांवर फोडण्याचे काम करतात, असे पियरे यांनी म्हटले आहे.
राजीनाम्याबद्दल बोलणे टाळले
कॅनडाच्या संसदेच्या सभापतींनी माफी मागितली असली तरीही राजीनामा देणार की नाही याबद्दल बोलणे टाळले आहे. सैनिक यारोसलाव हुंका हे दुसऱ्या महायुद्धात हिटलरकरता लढले होते याची कल्पना नव्हती असा सभापतींनी केला आहे.