सावंतवाडी/प्रतिनिधी-
सावंतवाडी शहरातील वास्तव्याला असणाऱ्या कोळेकर कुटुंबियांना घर उभारण्यासाठी आर्थिक हातभार लावण्यासाठी सावंतवाडी शहरातील जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.
सावंतवाडी शहरातील कोळेकर कुटुंब हालाखीचे जीवन जगत असून रहाण्याकरिता त्यांना पक्के घर नसणे हे भूषणावह नाही. सदर कुटुंबाला घर उभारण्यासाठी पत्रे, सिमेंट, वाळू, चिरे आदी साहित्याकरिता दीड ते दोन लाखाच्या खर्चाचा अंदाज आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून या कार्यात सावंतवाडीतील जनतेसह शासकिय कर्मचाऱ्यांनी निधी संकलनाकरिता सहभागी होण्याचे आवाहन साळगांवकर यांनी केले.
सदर सहाय्यता निधी आपल्याकडे सूपूर्द करावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी केले आहे. या निधीच्या माध्यमातून कोळेकर भगिनींचे सध्या दुरावस्थेत असलेले घर दुरूस्त करून देण्यात येईल असे त्यानी स्पष्ट केले आहे.