मुंबईत आणखी 2 स्टोअर्स होणार: युरोप, अमेरिकेतही विस्ताराची योजना
वृत्तसंस्था / मुंबई
आयफोन निर्माती दिग्गज कंपनी अॅपल आता भारतात आणखी 3 स्टोअर्स सुरु करण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे. तसं पाहता कंपनीचा भारतात प्रत्यक्ष प्रवेश होण्यास उशीर झाल्याचे सांगितले जात असले तरी आता कंपनी आक्रमक झाली असल्याचे समजते.
अलीकडेच मुंबई व नवी दिल्लीत अॅपलने आपली दोन स्टोअर्स सुरु केली असून या स्टोअर्सनी चांगला व्यवसाय केला असल्याची माहिती आहे. कंपनी आगामी काळात भारतासह आशिया पॅसिफीक, युरोप, मध्य पूर्व देश, अमेरिका व कॅनडा यासारख्या देशातही अॅपलला आपले लक्ष केंद्रीत करायचे आहे. विस्ताराच्या योजनेत भारतावर कंपनीचे अधिकचे लक्ष असणार आहे. 2025 मध्ये तिसरे कंपनीचे स्टोअर बोरीवली, मुंबई येथे तर चौथे तसेच दुसरे भारतातले मोठे स्टोअर डीएलएफ प्रोमेनेड मॉल, वसंत कुंज येथे होणार असल्याची माहिती आहे. सध्याला तरी बांद्रा कुर्ला संकुलातील स्टोअर हे भारतातले सध्याचे सर्वात मोठे स्टोअर मानले जाते. पाचवे नवे स्टोअर वरळी, मुंबईत सुरु होणार असल्याचे समजते. यासोबत कंपनी आशिया पॅसिफीकमध्ये 15 नवी स्टोअर्स, आशियात 6, युरोपमध्ये 9 आणि 13 उत्तर अमेरिकेत सुरु करणार असल्याची माहिती आहे.
दमदार महसूल
अॅपलने एप्रिलमध्ये सुरु केलेल्या भारतातील स्टोअर्सनी चांगली कामगिरी नोंदवली आहे. मुळात या दोन्ही स्टोअर्समधून पहिल्याच महिन्याला सरासरी 22 ते 24 कोटी रुपये महसुलातून मिळाल्याचे सांगितले जात आहे. तर या तुलनेत कंपनीला भाडे भरण्यासाठी 40 लाख रुपये भरावे लागत आहेत.