शिक्षण खात्यातील कारभार : अधिकाऱयांच्या फतव्यामुळे संताप, अतिवाड येथील एसडीएमसी सदस्यांना अनुभव
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटकी वरवंटा सुरू असताना आता प्रत्येक क्षेत्रात कन्नड भाषेतच अर्ज करा, असे सांगण्याचे प्रकारही वाढले आहेत. शिक्षण खात्यामध्येही असेच प्रकार सुरू असून मराठीत अर्ज आम्ही स्वीकारणार नाही तुम्ही कन्नडमध्येच द्या, असे सांगण्यात येत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. याचेच प्रत्यंतर आता अतिवाड येथील एसडीएमसी सदस्यांना आला आहे. शिक्षक व इतर समस्यांसाठी त्यांनी मराठीत अर्ज केला असता त्यांना कन्नडमध्ये अर्ज करा, असे सांगण्यात आले. समस्या सोडविण्याऐवजी भाषाभेद करण्यावरच येथील अधिकारी भर देत आहेत. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली.
अतिवाड मराठी शाळेमध्ये 160 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र येथील कारभार कंत्राटीपद्धतीवर काम करणाऱया शिक्षकांवर सुरू आहे तर एक मुख्याध्यापक आहे. विशेष करून येथील एसडीएमसीने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मागील 15 ते 20 दिवसांपासून शिक्षकांच्या मागणीसाठी पाठपुरावा केला आहे. याबाबत अनेकवेळा सांगण्यात आले. मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे.
विद्यार्थी अधिक असल्याने शिक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी केली. दरम्यान कन्नड विषय शिकविणारे शिक्षक या ठिकाणी कायमस्वरुपी नेमावे, या मागणीसाठी मराठीतून अर्ज केला. मात्र शिक्षण खात्याच्या अधिकाऱयांनी हा अर्ज चालणार नाही. तुम्ही कन्नडमधूनच अर्ज करावा, असे ठणकावून सांगितले. भाषावर प्रांतरचनेनुसार 15 टक्क्मयांपेक्षा अधिक ज्या भाषेतील नागरिक राहतात त्यांना त्या भाषेतून कागदपत्रे मिळणे गरजेचे आहे. मात्र कन्नडसक्तीच्या वरवंटय़ाखाली येथील अधिकाऱयांना काहीच सुचत नसल्याचे दिसून येत आहे.
मराठी शाळेसाठी कन्नड शिक्षिका नेमणुकीबाबत मराठीतून अर्ज केल्याचाही पोटशूळ उठत असल्याने अतिवाड व सीमाभागातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. विद्या देणाऱया शिक्षण खात्यातील अधिकाऱयांनीच कन्नडसक्तीचा फतवा कशासाठी काढायचा आणि तेही कन्नड शिक्षक नेमणुकीबाबत. त्यामुळे कन्नड हट्टापाई विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचा हा प्रकार असल्याचे मत येथील एसडीएमसी सदस्यांनी व्यक्त केले आहे.
कन्नडमधून अर्ज घेऊन या, असे एसडीएमसी सदस्यांना सुनावण्यात आले. यावेळी सदस्यांनी आम्हाला कन्नड येत नाही. विशेष करून आम्ही कन्नड शिकलो नाही. त्यामुळे आमच्या मुलांना तरी कन्नड शिकविण्यासाठी शिक्षक द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी सर्वच सदस्यांनी अधिकाऱयांना धारेवर धरले असता साहेब येवू द्या त्यानंतर तुम्ही या, तुमचा अर्ज स्वीकारला जाईल, असे सांगण्यात आले. मात्र अर्ज घेणार नसाल तर तसे लेखी स्वरुपात लिहून द्या, असे म्हणताच अधिकाऱयांची चांगलीच गोची झाली. त्यानंतर शिक्षण खात्यातील अधिकाऱयांनी अर्ज स्वीकारला आहे. मागील अनेक महिन्यांपासून कन्नड शिक्षक व इतर शिक्षकांची नेमणूक करण्यात आली नसल्याने अतिवाड ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.