पंतप्रधानांच्या उपस्थितीत 45 ठिकाणी व्हर्च्युअल रोजगार मेळा : भारत लवकरच टॉप-3 अर्थव्यवस्थेत पोहोचण्याचा विश्वास
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
10 लाख उमेदवार भरतीसाठी ‘रोजगार मेळा’ मोहिमेअंतर्गत 51,000 हून अधिक तरुणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नियुक्तीपत्रांचे वाटप केले. यावेळी या तऊणांना संबोधित करताना स्वातंत्र्याच्या या अमृतोत्सवात देशाच्या स्वातंत्र्याचे आणि करोडो लोकांचे अमृत रक्षक बनल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन, अशा शब्दात स्वागत केले. आज नियुक्तीपत्रे मिळत असलेले उमेदवार देशसेवा करण्याबरोबरच देशातील नागरिकांचेही रक्षण करतील. तुमच्या साथीने भारत वेगाने प्रगती करणार असून देश लवकरच ‘टॉप-3’ अर्थव्यवस्थेत प्रवेश करेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
भारतात सध्या अभिमान आणि आत्मविश्वासपूर्ण वातावरण तयार झालेले असताना रोजगार मेळा आयोजित केल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. आपले चांद्रयान आणि त्याचे रोव्हर प्रज्ञान चंद्रावरून सातत्याने ऐतिहासिक छायाचित्रे पाठवत आहे. याचदरम्यान हजारो उमेदवार आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या प्रवासाला सुरुवात करत आहेत. सैन्यात भरती व्हावे, सुरक्षा दलात भरती व्हावे, पोलीस सेवेत जावे, देशाच्या रक्षणाचे रक्षक व्हावे हे प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते अशी स्वप्ने कित्येक जण पाहत असतात. या स्वप्नांची पूर्ती आज होत असून कित्येकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
…या पदांवर भरती
देशभरात 45 ठिकाणी ‘रोजगार मेळा’ आयोजित करण्यात आला होता. या रोजगार मेळाव्यात केंद्रीय गृह मंत्रालय, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), सशस्त्र सीमा बल (एसएसबी), आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआईएसएफ), इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (आईटीबीपी) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) तसेच दिल्ली पोलीस आदी विविध पदांवर कर्मचारी भरती करण्यात आली. देशभरातून नव्याने निवडलेले कर्मचारी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत विविध संस्थांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी), सब-इन्स्पेक्टर (जनरल ड्युटी) आणि नॉन-जनरल ड्युटी पॅडर पदांसारख्या विविध पदांवर रुजू होणार आहेत.
भरती प्रक्रियेत गतिमानता
आमच्या सरकारकडून उमेदवारी अर्ज ते निवडीपर्यंतची प्रक्रिया वेगवान करण्यात आली आहे. निमलष्करी दलातील भरतीसाठीची परीक्षा आता 13 स्थानिक भाषांमध्येही घेतली जात आहे. या बदलामुळे लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. एकेकाळी उत्तर प्रदेश विकासाच्या बाबतीत खूप मागे आणि गुन्हेगारीच्या बाबतीत खूप पुढे होते. पण आता कायद्याचे राज्य प्रस्थापित झाल्याने उत्तर प्रदेश विकासाच्या नव्या उंचीला स्पर्श करत असल्याचे उदाहरण पंतप्रधानांनी दिले.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या गतीचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोणत्याही अर्थव्यवस्थेला पुढे जाण्यासाठी देशातील प्रत्येक क्षेत्राचा विकास होणे आवश्यक आहे. फूडपासून फार्मा, स्पेसपासून स्टार्टअप्सपर्यंत, प्रत्येक क्षेत्र पुढे जाईल तेव्हा अर्थव्यवस्थाही पुढे जाईल. आज भारतात पायाभूत सुविधांचा वेगाने विकास होत आहे. गेल्या 9 वर्षांत केंद्र सरकारने पायाभूत सुविधांवर 30 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे. 2030 पर्यंत आपल्या अर्थव्यवस्थेत पर्यटन क्षेत्राचे योगदान 20 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल असा अंदाज आहे. पर्यटन उद्योगातून 13 ते 14 कोटी लोकांना नवीन रोजगार मिळण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. गेल्या 9 वर्षांच्या आमच्या प्रयत्नांनी बदलाचा आणखी एक नवीन टप्पा दिसू लागला आहे. गेल्यावषी भारताने विक्रमी निर्यात केली. जागतिक बाजारपेठेत भारतीय वस्तूंची मागणी सातत्याने वाढत असल्याचे हे द्योतक असल्याचे प्रतिपादनही पंतप्रधानांनी केले.
परिवर्तनाचे नवे पर्व दृष्टिपथात
देशात सुरू असलेल्या लोककल्याणकारी योजनांबद्दल बोलताना पंतप्रधानांनी ‘वोकल फॉर लोकल’ या मंत्राला अनुसरून भारत सरकारही ‘मेड इन इंडिया’ लॅपटॉप, कॉम्प्युटर यासारख्या उत्पादनांच्या खरेदीसाठी आग्रही आहे. सध्या मॅन्युपॅक्चरिंगमध्येही वाढ झाली असून तऊणांसाठी रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होत आहेत. 9 वर्षांपूर्वी याच दिवशी प्रधानमंत्री जन धन योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेने गावातील आणि गरिबांच्या आर्थिक सक्षमीकरणात तसेच रोजगार निर्मितीमध्ये मोठी भूमिका बजावली आहे. या योजनेअंतर्गत गेल्या 9 वर्षांत 50 कोटींहून अधिक जन धन खाती उघडण्यात आली आहेत, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.