वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने इंग्लंडच्या पु रुष क्रिकेट संघाचे परफॉर्मन्स डायरेक्टर मो बॉबट यांना त्यांचे नवीन क्रिकेट संचालक म्हणून नियुक्त केले आहे, माईक हेसन यांची जागा ते घेतील. हेसन हे या वर्षाच्या सुरुवातीला सदर पदभारातून मोकळे झाले. इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) या संघाने शुक्रवारी ही घोषणा केली. 2011 पासून इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाशी संबंधित राहिलेले आणि इंग्लंडच्या ‘टी20’ तसेच एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकातील यशात महत्त्वाची भूमिका बजावलेले बॉबट फेब्रुवारी, 2024 मध्ये आपल्या पदभारातून मोकळे होतील. बॉबटने आरसीबीचे सध्याचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांच्याबरोबर ते इंग्लंड क्रिकेट संघाचे प्रशिक्षक असताना काम केलेले आहे.